राज्यात नुकत्याच महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारांची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
वाळवा तालुक्यातील येलूरमध्ये स्व. राजाराम बापू पाटील यांच्या फोटोला टाचण्या टोचल्याचे आणि फोटोवर लिंबू ठेवल्याचे आढळून आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. स्व. राजाराम बापू पाटील हे माजी मंत्री जयंत पाटील यांचे वडील आहेत.या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले आहे, "सांगलीमध्ये (येलूर, ता. वाळवा) लोकनेते स्व. राजाराम बापू पाटील यांचा फोटो असलेल्या पोस्टरला काळा रंग फासून, टाचण्या टोचून आणि त्यावर लिंबू, केळी असा उतारा करुन हा फोटो रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे, "असे पवार यांनी म्हटले आहे."पुरोगामी महाराष्ट्रात असा प्रकार होत असेल आणि एका दिवंगत लोकनेत्याच्या फोटोची अशा प्रकारे विटंबना केली जात असेल तर हे संतापजनक आणि चीड आणणारं आहे. हे करणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी, ही विनंती!, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.