किडनी विक्री प्रकरणात देशातील दोन प्रतिष्ठित डॉक्टरांची नावे समोर आल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील आणखी काही 'बडे मासे' पोलिसांच्या रडारवर आले आहेत. या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, कोलकाता येथील ज्या पॅथॉलॉजीमध्ये रक्तचाचण्या करण्यात आल्या होत्या. तेथे तपासासाठी नागभीड तालुक्यातील रोशन कुडे यांना घेऊन विशेष तपास पथक आज बुधवारला रवाना झाले आहे. दरम्यान, किडनी विक्रीत कोट्यवधी रुपयांची तस्करी होत असून, केवळ पाच ते आठ लाख रुपयेच पीडितांच्या हातात पडत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील दिल्लीतील आरोपी डॉ. रविंद्रपाल सिंग यांचे नाव उगड झाले असून त्यांचे नाव सन २०२२ मध्ये पद्मश्री पुरस्काराच्या नामांकन यादीत होते.
रोशन कुडे यांच्या कंबोडियातील किडनी विक्री प्रकरणातून देशभर पसरलेल्या मानवी अवयव तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणात सोलापूर येथून अटक करण्यात आलेला रामकृष्ण सुंचू उर्फ डॉ. कृष्णा याच्या कॉल डिटेल्समध्ये दिल्ली येथील डॉ. रविंद्रपाल सिंग यांचे नाव पुढे आले. त्यानंतर पोलिस तपासात तामिळनाडू राज्यातील त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी यांच्याशी संबंधित दुवे समोर आले.
डॉ. राजरत्नम यांच्या रुग्णालयात बेकायदेशीररीत्या किडनी काढून प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया केल्या जात असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. पंजाबमधील मोहाली येथून अटक करण्यात आलेल्या हिमांशू भारद्वाज याच्यावर जुलै २०२२ मध्ये याच रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आतापर्यंत तपासात या रुग्णालयात १५ हून अधिक बेकायदेशीर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, या दोन्ही डॉक्टरांच्या अटकेसाठी विशेष तपास पथक रवाना झाले होते. २९ डिसेंबर रोजी डॉ. रविंद्रपाल सिंग यांना दिल्लीत अटक करण्यात आली. मात्र, पहाटे चार वाजता खराब हवामानामुळे विमान उड्डाण करू न शकल्याने त्यांना २४ तासांच्या आत चंद्रपूर न्यायालयात हजर करणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांना दिल्लीतील रोहिणी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यासाठी अतिशय तातडीने रात्रीच एक पोलिस उपनिरीक्षक या प्रकरणाशी संबंधित महत्वाची माहिती न्यायालयात सादर करण्यासाठी दिल्लीत पोचला.डॉ. रविंद्रपाल सिंग हे अत्यंत प्रतिष्ठित डॉक्टर असून ते तपासात सहकार्य करतील, असे नमूद करत न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला. तसेच, २ जानेवारी रोजी चंद्रपूर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांचा मोबाईल तपास पथकाने ताब्यात घेतला आहे.डॉ. रविंद्रपाल सिंग हे मॅक्स हेल्थकेअर येथे यकृत-अग्न्याशय-पित्तनलिका शस्त्रक्रिया विभागाचे प्रिन्सिपल कन्सल्टंट असून, जटिल गॅस्ट्रो शस्त्रक्रियांमध्ये तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वैद्यकीय सेवेची दखल घेत २०२२ मध्ये त्यांचे नाव पद्मश्री पुरस्कारासाठी नामांकनात समाविष्ट करण्यात आले होते.
दुसरीकडे, तामिळनाडू येथील डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. डॉ. राजरत्नम यांच्या कुटुंबातील एक सदस्य राज्यात मंत्री असल्याने राजकीय दबावामुळे तपास पथकाला त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत असल्याची चर्चा आहे. सहा महिन्यांपूर्वीही डॉ. राजरत्नम यांचे नाव बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण प्रकरणात पुढे आले होते; मात्र त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई होऊ शकली नव्हती. दरम्यान, कृष्णा व हिमांशू भारद्वाज यांच्याव्यतिरिक्त देशात किडनी विक्रीसाठी कार्यरत असलेली मोठी साखळी असल्याचे तपासात समोर आले आहे. उपरोक्त दोन्ही डॉक्टर तपास पथकाच्या हाती लागल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
असा झाला डॉ. रविंद्रपाल-कृष्णाचा संपर्क
रामकृष्ण सुंचू उर्फ कृष्णा याने कंबोडियात स्वतःची किडनी विकल्यानंतर या रॅकेटमध्ये सहभाग घेतला. त्याने आतापर्यंत १६ जणांना किडनी विक्रीसाठी कंबोडियात पाठवले. कोरोनानंतर तोतिथे जाऊ शकला नाही. मात्र, पैशाच्या हव्यासामुळे त्याने देशातील अनेक किडनी प्रत्यारोपण करणाऱ्या डॉक्टरांची 'आरोग्य तपासणी'च्या नावाखाली भेट घेण्यास सुरुवात केली. २००३ मध्ये कृष्णाने डॉ. रविंद्रपाल सिंग यांच्या रुग्णालयात तपासणी केली होती. त्यावेळी त्याने कंबोडियात किडनी विकल्याची माहिती दिली.त्यावर अनेक रुग्ण किडनी डोनरच्या प्रतीक्षेत असल्याचे डॉ. रविंद्रपाल यांनी सांगितले. याच क्षणापासून दोघांमध्ये संपर्क वाढला. ते मोबाईल चॅटिंगद्वारे सातत्याने संपर्कात होते. डॉ. रविंद्रपाल हे डॉ. राजरत्नम यांच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करत असत. त्यांच्या प्रवासासाठी 'मेक माय ट्रिप'वरून विमान तिकिटांचे बुकिंग कृष्णाच करीत असे. आतापर्यंत २० हून अधिक वेळा डॉ. राजरत्नम त्या ठिकाणी गेल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे या किडनी प्रकरणातील पीडितांची संख्या मोठी असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
असे होते पैशांचे वाटप…
किडनी घेणाऱ्या रुग्णांकडून : ५० ते ८० लाख रुपये
डॉ. रविंद्रपाल सिंग (सर्जन) : १० लाख रुपये
डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी (ऑपरेशन थिएटर व सुविधा) : २० लाख रुपये
रामकृष्ण सुंचू उर्फ कृष्णा : २० लाख रुपये
किडनी विकणाऱ्याला : केवळ ५ ते १० लाख रुपये
भीतीमुळे पीडित आलेच नाहीत
रोशन कुडे यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ येत्या ३ जानेवारी रोजी मिंथूर ते नागभीड पायदळ मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत.या मोर्चात रोशन कुडे यांच्यासोबत किडनी विकलेल्या पाच युवकांनीही सहभागी होण्याची तयारी दर्शविली होती. मात्र मंगळवारी नागपुरात येण्यासाठी ठरलेले हे युवक प्रत्यक्षात आले नाहीत. पाचपैकी केवळ एक युवक नागपुरात पोहोचला होता; मात्र इतर सहकारी न आल्याचे लक्षात येताच तोही परत गेल्याची माहिती आहे. भीती तसेच पोलिस चौकशीला सामोरे जावे लागेल, या कारणामुळे हे युवक मोर्चात सहभागी होण्यासाठी आले नसावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.