Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'दुखवटा संपण्याआधीच शपथविधी, माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्त्व'; संजय शिरसाट यांनी थेटच सांगितलं

'दुखवटा संपण्याआधीच शपथविधी, माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्त्व'; संजय शिरसाट यांनी थेटच सांगितलं


छत्रपती संभाजीनगर:  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजितदादांवर अंत्यसंस्कार होऊन अवघे ४ दिवस उलटत नाही, तोच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. "दुखवटा संपण्याआधीच शपथविधी होतोय. राजकारणात माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्त्व दिलं जात असल्याचं दिसतं," अशी भावना त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. 

अजित पवार यांच्या निधनानंतर इतक्या वेगाने घडामोडी घडतील, अशी अपेक्षा नव्हती, असं शिरसाट म्हणाले. "काही कालावधीनंतर हालचाली होतील असं वाटत होतं. मात्र इतक्या तातडीने घडामोडी, सुनेत्रा पवार यांचं मुंबईला जाणं आणि नेत्यांची वक्तव्यं येणं.हे अनपेक्षित होतं," असं त्यांनी सांगितलं. आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं सांगत, "सर्व विषयांचा लवकरच निपटारा होईल. पण एवढ्या घाईने शपथविधी घेण्याची गरज नव्हती; आठ दिवसांनी घेतला असता. कुठली भीती त्यांना सतावत होती?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शपथविधीची घाई का?

"अलीकडच्या घडामोडींवरून असं वाटतं की माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्त्व आहे. दुखवटा संपण्याआधी शपथविधी होणं हे योग्य नव्हतं. ही सर्वसामान्यांची भावना आहे. तीच मी व्यक्त करतोय," असं शिरसाट म्हणाले. "अजित पवार हे राष्ट्रवादीचे मुख्य नेते होते. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. सामूहिक निर्णयांचा काळ सुरू असल्याचं दिसतं. त्यामुळेच शरद पवार यांनी 'खंड पडेल' असं सूचक वक्तव्य केलं असावं. या घडामोडींमध्ये शरद पवारांना कितपत माहिती होती, हे सांगणं कठीण आहे," असं त्यांनी नमूद केलं. 

"देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भूमिका हीच आमची भूमिका आहे. त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी घ्यावा. आम्ही विरोध करणार नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा विचार त्यांचा होता. यात भाजपचे संबंध नाहीत. ते घडलं असतं तर ते एनडीए महायुतीत आले असते," असेही शिरसाट म्हणाले.

राष्ट्रवादीच्या केंद्रीय नेतृत्वाबाबत, "पवार कुटुंबातील व्यक्ती राष्ट्रीय अध्यक्ष होईल, असं निश्चित मानलं जात आहे," असं त्यांनी सांगितलं. स्थानिक जिल्हा परिषद निवडणुकांतील आरोपांवर ते म्हणाले, "भाजपने काय बोलावं हा त्यांचा विषय आहे. पण स्थानिक नेते इतक्या सफाईने खोटं बोलतील यावर विश्वास बसत नाही. आम्हाला बोलायला लावू नका. अन्यथा वरिष्ठांकडे तक्रारी मांडू."



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.