राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवार, दि. २८ जानेवारी रोजी विमान अपघातामध्ये निधन झालं. त्यांच्या जाण्याने पक्ष आणि सरकारमधील त्यांची जागा रिक्त झाली. ती जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली आहे. त्यांनी राजभवनातील लोकभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंचावर उपस्थिती होती.
तसेच सरकारमधील अनेक मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, राष्ट्रादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, भाजप आणि शिवसेना त्यांची उपस्थिती होती. कुठलाही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने शपथविधी सोहळा पार पडला आहे. मात्र खातेवाटप पुढील काळात होणार असून सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी दिली जाते, हे लवकरच स्पष्ट होईल.दरम्यान, शनिवारी सकाळी पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी शपथविधीबद्दल माहिती नसल्याचं म्हटलं होतं. हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, आपल्याला याबाबत काहीही सांगितलं नसल्याचं पवार म्हणाले होते. त्यानंतर पार्थ पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि शपथविधीचं निमंत्रण दिल्याचं सांगितलं गेलं. मात्र शरद पवार हे शपथविधीसाठी हजर नव्हते.
दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या मूळ गावी काटेवाडी येथे जात अजित पवारांच्या आईंची भेट घेतली. एकीकडे मुंबईत शपथविधी सोहळा सुरु होता तर दुसरीकडे बारामतीमध्ये मात्र शोकाकूल वातावरण होतं. पटापट घडलेल्या या राजकीय घडामोडींमुळे आश्चर्य व्यक्त होतंय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.