Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपचे ४२, शिंदेसेनेचे २० कोट्यधीश उमेदवार महापालिका रिंगणात; सर्वाधिक श्रीमंत कोण.. जाणून घ्या

सांगली :-भाजपचे ४२, शिंदेसेनेचे २० कोट्यधीश उमेदवार महापालिका रिंगणात; सर्वाधिक श्रीमंत कोण.. जाणून घ्या


सांगली : महापालिकेच्या निवडणुकीत यंदा कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असलेल्या उमेदवारांची चलती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उमेदवारी अर्जासोबत सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांनुसार तब्बल ६२ पुरुष आणि ५० महिला असे ११२ कोट्यधीश उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून, यात पक्षीय उमेदवारांसह अपक्षांचाही समावेश आहे. भाजपने ४२, शिंदेसेनेकडून २० करोडपती निवडणूक लढवित आहेत. यात काँग्रेसच्या सोनल पाटील या सर्वांत श्रीमंत उमेदवार ठरल्या आहेत.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत यंदा भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार), शिंदेसेना, राष्ट्रवादी (अजित पवार), उद्धवसेना यांच्यात सत्ता मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. महायुती व महाआघाडीला फाटा देत सर्वच पक्ष स्वबळाची ताकद आजमावित आहेत. भाजपने सर्व ७८ जागांवर उमेदवार दिले आहेत. यात ४२ उमेदवार कोट्यधीश असल्याचे निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रातून दिसून येते. त्याखालोखाल शिंदेसेनेकडे २०, काँग्रेसकडे १७, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडे १२, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडे नऊ उमेदवारांची मालमत्ता कोटीच्या पुढे आहे. शेकापच्या एकमेव उमेदवार असलेल्या सुवर्णा कोकाटे याही कोट्यधीश आहेत. तब्बल ११ अपक्ष उमेदवारही कोट्यधीश आहेत. यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बंडखोरांचा समावेश असल्याचे प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट होते. महापालिका निवडणूक ही लोकप्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया असली तरी, वाढत्या कोट्यधीश उमेदवारांमुळे सामान्य उमेदवारांसाठी स्पर्धा अधिक कठीण होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. आर्थिक ताकद आणि लोकसंपर्क यांचा समतोल राखत मतदार कोणता निर्णय घेतात, याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

काहींच्या संपत्तीत वाढ
२०१८ मधील महापालिका निवडणुकीत उमेदवारांनी आपली मालमत्ता जाहीर केली होती. यंदा निवडणूक आयोगाने गत निवडणुकीतील मालमत्तेची आकडेवारीही बंधनकारक केली. त्यामुळे प्रतिज्ञापत्रात यंदाची मालमत्ता व गत निवडणुकीवेळीची मालमत्ता अशा दोन्हीची आकडेवारी उमेदवारांनी दिली आहे. यात अनेक उमेदवारांच्या मालमत्तेला कोटीच्या कोटी उड्डाणे पाहायला मिळत आहेत.
अनेक प्रभागांत विरोधाभास

एकीकडे राजकीय पक्षांचे उमेदवार गर्भश्रीमंत असताना काही प्रभागांत अपक्ष व इतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या मालमत्तेत मोठा विरोधाभास दिसून येतो. एका उमेदवारांकडे केवळ एक दुचाकी आपल्याकडे असल्याचे प्रतिज्ञापत्रात नोंद आहे, तर दुसरीकडे श्रीमंत उमेदवारांचे आकडे डोळे फिरविणारे आहेत.

प्रभाग ११ मधील तीनही महिला कोट्यवधी
प्रभाग ११ मधील सर्वसाधारण महिला गटात भाजप, काँग्रेस व शिंदेसेना असा तिरंगी सामना आहे. या प्रभागातील तिन्ही महिला उमेदवार कोट्यधीश आहेत.
शिक्षण कमी व मालमत्ता कोटीची

निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सर्वच पक्षांतील काही उमेदवारांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. पण त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता मात्र कोटीच्या पुढे आहे. यात काही माजी नगरसेवकांचाही समावेश आहे.

टॉपटेन कोट्यधीश
१. सोनल विक्रम पाटील (काँग्रेस) वाॅर्ड १५ - ३१,१८,७३,३१३
२. गणेश माळी (भाजप)- वाॅर्ड ७ - १६,२६,८७,८७१
३. विद्या नलवडे (भाजप) वाॅर्ड ४ - १२,१७,१९,५५१
४. पद्मिनी जाधव (अपक्ष) वाॅर्ड १६- ११,९५,६१,९६२
५. ईलाही बारुदवाले (अपक्ष) वाॅर्ड ९- ९,९२,२३,५९२
६. सविता मिरजे - (काँग्रेस) वाॅर्ड १९- ९,५७,०७,८८३
७. प्रकाश पाटील (भाजप) वाॅर्ड २- ७,६७,८३,२९९
८. मैनुद्दीन बागवान राष्ट्रवादी (अजित पवार) वाॅर्ड ६- ७,४४,५५,०२५
९. स्वाती शिंदे (भाजप) वार्ड १६- ७,२५,६७,३२८
१०. राजेंद्र मुळीक राष्ट्रवादी (शरद पवार) - वाॅर्ड १०- ७,०२,९९,३३२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.