पुणे : सरकारी रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था सुरळीत सुरू आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाने भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. ही पथके कोणत्याही रुग्णालयाला अचानक भेट देऊन तपासणी करणार आहेत. यात कर्मचाऱ्यांची उपस्थिती, रुग्णालयातील व्यवस्था, स्वच्छता यासह इतर अनेक बाबींची तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे सरकारी रुग्णालयांचे कामकाज सुधारण्यास मदत होणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुणे परिमंडळाने भरारी पथकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, परिमंडळ स्तरावर दोन भरारी पथक नेमण्यात आली आहेत. पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा व स्त्री रुग्णालयांना हे भरारी पथक अचानक भेटी देऊन तपासणी करणार आहे. पहिल्या पथकात आरोग्य सेवा पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. आरिफ सय्यद, कार्यक्रम व्यवस्थापक गणेश जगताप, मूल्यमापन व संनियंत्रण अधिकारी धनाली कौलगे, सुविधा व्यवस्थापक सागर शेळके यांचा समावेश आहे. दुसऱ्या पथकात प्रादेशिक मनोरुग्णालय येरवड्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीनिवास कोलोड, रुग्णालयाचे कार्यालयीन अधीक्षक प्रशांत बडगीरे आणि राष्ट्रीय क्षय निर्मूलन कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. रोहन घुगे यांचा समावेश आहे.सरकारी रुग्णालयांच्या इमारतीची अवस्था, सुरक्षितता आणि स्वच्छता या तपासणीवर भरारी पथकांकडून जास्त भर दिला जाणार आहे. रुग्णालयांमध्ये नागरिकांसाठी योग्य सूचना फलक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती, उपलब्ध कर्मचारी, कर्मचाऱ्यांचा गणवेश व ओळखपत्र या बाबीही बारकाईने पाहिल्या जाणार आहेत. तसेच, बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण विभागातील रुग्णसेवेचीही तपासणी केली जाईल. रुग्णालयातील जीवनावश्यक औषधांच्या साठ्याचा आढावा घेतला जाणार आहे. यात कालबाह्य औषधांची ई-औषधी अहवालानुसार पडताळणी भरारी पथक करणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
संवर्धनपर्वाची समाप्ती…
जिल्हास्तरीय पथकांचीही नियुक्ती
आरोग्य विभागाने पुणे, सातारा, सोलापूरसाठी सरकारी रुग्णालयांच्या नियमित तपासणीसाठी जिल्हास्तरीय पथकांची नियुक्तीही केली आहे. पुण्यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यम्पल्ले, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. भाग्यश्री पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. सुहास कोरे आणि सहायक संचालक (हिवताप) डॉ. प्रताप सारणीकर यांच्या नेतृत्वाखाली चार पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकांकडूनही सरकारी रुग्णालयांची नियमितपणे तपासणी केली जाणार आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
आरोग्य सेवेचा दर्जा सुधारणार
सरकारी रुग्णालयांमध्ये नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा देण्याचा आरोग्य विभागाचा हेतू आहे. या दृष्टीने सर्व रुग्णालयांतील रुग्णसेवा सुधारण्यास आरोग्य विभागाने प्राधान्य दिले आहे. यातील सुधारणांची अंमलबजावणी रुग्णालयांमध्ये होते का, याची तपासणी भरारी पथक करणार आहे. यातून रुग्णालयांतील त्रुटी समोर येऊन त्या दूर करणे शक्य होणार आहे, अशी माहिती आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.