Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"महापौर भाजपचाच, नाहीतर आम्ही विरोधी पक्षात बसू!" सुधीर मुनगंटीवारांचा शिंदे गटाला थेट इशारा; मुंबईच्या सत्तेसाठी महायुतीत ठिणगी

"महापौर भाजपचाच, नाहीतर आम्ही विरोधी पक्षात बसू!" सुधीर मुनगंटीवारांचा शिंदे गटाला थेट इशारा; मुंबईच्या सत्तेसाठी महायुतीत ठिणगी


मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या  निवडणुकीनंतर आता सत्ताकारणापेक्षा महापौरपदावरून सुरू झालेली रस्सीखेच अधिक गडद होत चालली आहे. सर्वाधिक 89 जागा जिंकून भाजप मुंबईच्या सत्तेच्या स्वप्नाच्या जवळ पोहोचला असला, तरी महायुतीतील अंतर्गत मतभेदांमुळे महापौर निवडणूक लांबण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली असून हे पद  सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. मात्र, हे पद भाजपकडे जाणार की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे, यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. 

भाजप आणि शिंदे गट शिवसेना या दोन्ही पक्षांनी महापौरपदावर दावा केला आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याचा आधार देत महापौरपद आपलंच असावं, अशी ठाम भूमिका घेत आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून महापौरपद किंवा किमान स्थायी समिती अध्यक्षपदाची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीत समन्वयाचा अभाव उघडपणे दिसून येत आहे.

या वादाला अधिक धार आली ती भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यामुळे. महापौरपदावर स्पष्ट दावा करत त्यांनी "महापौर भाजपचाच होईल, अन्यथा भाजप विरोधी पक्षात बसेल," अशी ठाम भूमिका मांडली. उबाठा गटाचा महापौर होण्याचा प्रश्नच नाही, तसेच दुसऱ्या पक्षाचा महापौर करण्यामध्ये भाजप नगरसेवकांना कोणतीही रुची नाही, असं सांगत त्यांनी शिंदे गटाला थेट इशाराच दिला आहे. या वक्तव्यामुळे युतीतील तणाव आणखी वाढला आहे. 

दरम्यान, दोन्ही पक्षांची गटनोंदणी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे महापौर निवडीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. आधी 31 जानेवारी रोजी मतदान होण्याची शक्यता होती, मात्र आता ही निवड फेब्रुवारीमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनानेही गटनोंदणी पूर्ण न झाल्याने कार्यक्रम पुढे ढकलावा लागल्याचं स्पष्ट केलं आहे. एकीकडे मुंबईचा कारभार स्थिर व्हावा, अशी अपेक्षा असताना दुसरीकडे सत्ताधारी युतीतील वादांमुळे महापालिकेतील सत्ता अजूनही अनिश्चिततेत अडकलेली आहे. महापौर कोण होणार, याचं उत्तर मिळण्यासाठी आता सर्वांचं लक्ष भाजप आणि शिंदे गटातील चर्चांकडे लागले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.