भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर जे.पी. नड्डा आहेत. मात्र त्यांच्या जागी कुणाची निवड होणार? याची चर्चा मागच्या काही महिन्यांपासून सुरु होती. अखेर हा सस्पेन्स संपला आहे. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष आणि पाच वेळा आमदार राहिलेले नितीन नबीन यांची भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
नितीन नबीन यांच्यासाठी ३७ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. मंगळावारी सकाळी ११.३० वाजता त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. नितीन नबीन हे जेपी नड्डा यांची जागा घेणार आहेत.
निवडणूक अधिकारी डॉ. के. लक्ष्मण यानी काय सांगितलं?
निवडणूक अधिकारी डॉ. के. लक्ष्मण यांनी सांगितले की, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नियमांनुसार, ३६ पैकी ३० राज्यांमध्ये राज्याध्यक्षांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर ही प्रक्रिया सुरू होते. ही संख्या आवश्यक ५० टक्केंपेक्षा पेक्षा जास्त आहे. या निवडणुकीसाठी १६ जानेवारी २०२६ रोजी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली होती. सोमवारी दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. नितीन नबीन यांच्या समर्थनार्थ एकूण 37 नामांकन अर्ज सादर करण्यात आले. सर्व नामांकन अर्जांची तपासणी करण्यात आली. हे सर्व अर्ज वैध असल्याचे पहायला मिळाले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख संपल्यानंतर, निवडणूक अधिकाऱ्यांनी अध्यक्षपदासाठी फक्त एकच उमेदवार म्हणजे नितीन नबीन हे असल्याचे जाहीर केले. याचाच अर्थ नितीन नबीन यांची बिनविरोध निवड झाली आहे. नितीन नबीन मंगळवारी सकाळी पदभार स्वीकारतील. ANI या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे.
नितीन नबीन यांचा राजकीय प्रवास कसा आहे?
नितीन नबीन यांचा जन्म २३ मे १९८० ला बिहारमधील पाटणा या ठिकाणी झाला. त्यांचे वडील किशोर प्रसाद सिन्हा हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि बांकीपूरचे माजी आमदार होते.२) नितीन नबीन यांनी २००६ मध्ये त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर बांकीपूर येथून पोट निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले.३) २०१०, २०१५ आणि २०२० या तिन्ही निवडणुकांमध्ये ते विजयी झेल. २०२५ च्या विधानसभा निवडणुकीतही ते पाचव्यांदा आमदार झाले. बांकीपूर मतदार संघात त्यांना ९८ हजार २९९ मतं मिळाली.४) २०२५ च्या विधानसभा निवडणुकीनंतर नितीन नबीन यांना नितीश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं.५) नितीन नबीन हे सध्या बिहारचे बांधकाम मंत्री आहेत६) २०२१ ते २०२२ या कालावधीतही ते याच विभागाचे मंत्री होते७) नितीन नबीन यांनी पक्ष संघटनेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतीय युवा मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहार राज्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे.
नितीन नबीन राष्ट्रीय अध्यक्ष होतील याचा अंदाज आधीच बांधला गेला होता जो खरा ठरला
सहा वर्षांपूर्वी जे. पी. नड्डांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतली होती. त्याआधी नड्डांना भाजपाने कार्यकारी अध्यक्ष केले होते. त्यानंतर अधिकृतपणे केंद्रीय स्तरावरील संघटनात्मक निवडणूक झाल्यानंतर नड्डांची अध्यक्षपदी निवड केली गेली. ज्यानंतर ४५ वर्षीय नितीन नबीन यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. नितीन नबीन हे जे. पी. नड्डांचा कित्ता गिरवतील आणि त्यांच्याकडे भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचीही सूत्रे दिली जातील असा अंदाज बांधला जात होता, जो खरा ठरला आहे. मंगळवारी सकाळी ११.३० वाजता नितीन नबीन हे जे. पी. नड्डांकडून पदभार स्वीकारणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.