सांगली :- जिल्हा परिषदेचे मतदान पुढे ढकलले जाणार; आयोगाने मागविला जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल, नेमकं काय कारण?
सांगली : कर्नाटकातील मायाक्का चिंचली यात्रेचा मुख्य दिवस पाच फेब्रुवारीस असल्याने या दिवशी होणारे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला आहे. मायाक्का चिंचली यात्रेमुळे जिल्हा परिषद निवडणुकीचे मतदान पुढे ढकलावे, अशी मागणी जतचे आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे आदींनी आयोगाकडे केली आहे. आयोगाने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला होता.
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्याच्या निवडणुकीचे मतदान ५ फेब्रुवारीला आहे. मात्र, यंदा हाच दिवस मायाक्का चिंचली यात्रेचा मुख्य दिवस आहे. बहुजनांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचणी मायाक्का देवीच्या यात्रेस महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवरील गावांतून यात्रेसाठी सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा आदी जिल्ह्यांतून लाखो भाविक बैलगाड्या आणि वाहनांनी सहकुटुंब चिंचलीला जातात.यात्रेचा मुख्य विधी ५ फेब्रुवारीला असून या दिवशी लाखो मतदार गावाबाहेर असणार आहेत. यात्रेहून भाविक दोन दिवसांनी म्हणजे ७ फेब्रुवारीपर्यंत गावाकडे परतणार आहेत. त्यामुळे मतदानावर याचा परिणाम होऊन कमी मतदान होण्याची शक्यता आहे.याबाबत अनेकांनी मतदान पुढे ढकलण्याची केलेल्या मागणीची दखल घेत निवडणूक आयोगाने अहवाल मागवला आहे. तीन दिवस उशिरा म्हणजे ८ फेब्रुवारीला मतदान घेण्याबाबत विचारणा केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तालुक्यांचे निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निर्णय अधिकाऱ्यांकडून अहवाल घेऊन आयोगाला पाठविले आहेत. आता या अहवालाची दखल घेऊन आयोग कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.नियोजित वेळापत्रकानुसार ५ फेब्रुवारीस मतदान आणि ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार होती. आयोगाने मतदान पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यास सांगली जिल्ह्यात ८ फेब्रुवारीला, मतदान होऊ शकते. त्यामुळे मतमोजणीही पुढे ढकलावी लागणार आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीचे मतदान पुढे ढकलण्याबाबत निवडणूक आयोगाने अहवाल मागविला होता. त्यानुसार सर्व तालुक्यांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अहवाल घेऊन तो आयोगाला पाठविण्यात आला आहे. आता पुढील निर्णय आयोगाच्या स्तरावर होईल.
- सतीश कदम, उपजिल्हाधिकारी
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.