सांगली : सांगली महानगरपालिकेत अनपेक्षित स्थिती निर्माण झाली आहे. सत्तास्थापनेसाठी एकनाथ शिंदे यांच्याशी थेट बोलणे सुरू आहे. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यांचे दोन सदस्य मिळाल्यानंतर आमचे ४१चे बहुमत होईल. महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आली तर त्यांचेही स्वागतच आहे, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे व्यक्त केले. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला ३९ जागा मिळाल्या आहेत. सत्तास्थापनेसाठी एका जागेची गरज आहे. त्यासाठी शिवसेनेला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री पाटील यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ''सांगलीत अनपेक्षित स्थिती निर्माण झाली आहे.
३९ नगरसेवक म्हणजे ५० टक्के संख्याबळ होते. एक जादा लागतो. ४० ला महापौर होतो. नाहीतर टाय होईल. त्यामुळे टाय होणे आणि नंतर टॉस होणे याची राजकारणात रिस्क घ्यायची नसते. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे दोन नगरसेवक आहेत. त्यांच्याशी थेट बोलणे सुरू आहे. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.'' ते म्हणाले, ''महापौरपदाचे आरक्षण २० किंवा २३ तारखेला निघेल. त्यानंतर १५ दिवसांची मुदत असते. त्यामुळे लगेच घाई करणार नाही. त्यातच जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागल्या आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २१ आहे.त्यामुळे कोल्हापूर, पुणे आणि आज सांगली पूर्ण केले. आमच्यात स्पष्टता आहे. महायुतीतल्या घटक पक्षांशी बोलणी सुरू आहेत. शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदेंशी बोलणी सुरू आहेत. त्यांचा सकारात्मक प्रतिसाद आहे. त्यांचे दोन सदस्य मिळाले असल्याने ४१ संख्याबळ झाले आहे. महायुतीतील दुसरा घटक पक्ष अजित पवारांची राष्ट्रवादी तो बाहेर राहतो. त्यामुळे त्यांनाही घेण्याच्या विषयाबाबत सकारात्मक आहोत. स्थानिक राष्ट्रवादीमधून निवडून आलेल्या नगरसेवकांनी त्याबाबत ठरवावे लागेल. त्यांनी त्यांच्या वरिष्ठांनी निर्णय घ्यायचा आहे. ते बरोबर आले तर त्यांचे स्वागत आहे.''
मॅच टाय नको
पालकमंत्री पाटील म्हणाले, ''आमच्याकडे निम्मे सदस्य आहेत. महापौरपदावेळी मॅच टाय होईल. मग, टॉस टाकावा लागेल. ती रिस्क घ्यायला नको, अशी आमची भूमिका आहे. शिवाय काठावरचं बहुमत हे विकासाला योग्य नाही. आम्ही काठावरच्या गणितात राज्य चालवण्यात माहीर आहोत. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा माहीर राजकारणी आमच्याकडे आहे; पण विकासाला ते सोयीचं नसतं. त्यामुळे आम्ही प्रयत्न करू. समोरून प्रस्ताव आले तर सगळे आलबेल होईल. आम्ही विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करू.''
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.