परळी: मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू ठरलेले मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी परळी तालुक्यातील मिरवट येथील हरिनाम सप्ताह सोहळ्याला भेट दिली. यावेळी जरांगे पाटील यांनी राजकीय घडामोडींवर आपली रोखठोक मते मांडत भाजप आणि महायुतीवर निशाणा साधला.
माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी भाजपवर तीव्र शब्दात प्रहार केला. "भाजपवाले फार मोठे कलाकार आहेत. त्यांनी आधी महाविकास आघाडी संपवली आणि आता एकनाथ शिंदे व अजित पवार यांचाही काटा काढला आहे," असा खळबळजनक दावा त्यांनी केला. अजित पवार यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, "अजितदादांनी नासके आणि पापी लोक सोबत ठेवले, म्हणूनच मराठा समाज त्यांच्यापासून दुरावला. पुण्यासारख्या ठिकाणी त्यांना जे अपयश मिळाले, ते केवळ मराठा मतदारांच्या नाराजीमुळेच मिळाले आहे."
निवडणुकांपासून अलिप्त राहण्याचा पवित्रा कायम
नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांवर भाष्य करताना जरांगे पाटील यांनी सांगितले की, "मराठा समाज दुरावल्याचा थेट फटका या निवडणुकीत बसला आहे." मात्र, आपण स्वतः निवडणुकीच्या राजकारणात पडणार नाही, हे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. "मी विधानसभा, नगरपंचायत आणि महापालिका निवडणुकीत नव्हतो, आणि येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीतही मी अलिप्तच राहणार आहे," असे त्यांनी जाहीर केले.
एकजुटीचा मंत्र आणि कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा
जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 'मराठा-दलित-मुस्लिम' या समीकरणाचा पुनरुच्चार केला. "हे तीन समाज एकत्र आले की सगळ्यांचा धुरळा उडतो," असे ते म्हणाले. तसेच, परळी तालुक्यातील कुणबी प्रमाणपत्रांच्या तक्रारींबाबत आपण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी ह.भ.प. विष्णू महाराज उखळीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाला उपस्थित राहून जरांगे पाटील यांनी अध्यात्मिक ऊर्जा घेतली आणि समाजाला एकजुटीने राहण्याचे आवाहन केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.