'आमचं मत वाइन शॉप हटविणाऱ्यालाच'! साई सिलिकॉन व्हॅली सोसायटी प्रवेशद्वारावरील फलकामुळे बालेवाडीत चर्चा
बालेवाडी: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाणेर-बालेवाडी परिसरातील राजकीय वातावरण तापले असून उमेदवारांकडून सोसायट्यांमध्ये भेटीगाठी व प्रचारदौरा सुरू आहेत. अशावेळी बालेवाडी येथील 'साई सिलिकॉन व्हॅली' सोसायटीच्या प्रवेशद्वारावर 'आमचं मत वाइन शॉप हटविणाऱ्याला' असा फलक लावून रहिवाशांनी आपली ठाम भूमिका मांडली आहे. या फलकामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून तो येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या वाइन शॉपमुळे रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा फलक लावण्यात आल्याचे रहिवाशांनी सांगितले. संबंधित वाइन शॉपवर कायम ग्राहकांची गर्दी असते.
ग्राहक सोसायटीसमोरील रस्त्यावर वाहने उभी करून मद्य खरेदीसाठी जात असल्याने सोसायटीत ये-जा करताना अडथळे निर्माण होतात. रखवालदाराने आक्षेप घेतल्यास त्याला अनेकदा दमदाटी केली जाते, तर काही वेळा मारहाणही सहन करावी लागते. सायंकाळी सातनंतर महिलांना सोसायटीबाहेर पडणेही अवघड होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.या सोसायटीसमोर 'एसकेपी' कॅम्पस, 'डीआयएमआर' महाविद्यालय, भारती विद्यापीठ शाळा आणि रवींद्रनाथ टागोर शाळा अशा शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे येथे येणारे विद्यार्थी रोज हा प्रकार पाहत असून त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाइन शॉपमधून मद्य खरेदी केल्यानंतर काही ग्राहक रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत मद्यपान करतात, तिथेच अस्वच्छता करतात. काचेचे व प्लॅस्टिकचे ग्लास, रिकाम्या बाटल्या टाकून दिल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे.रस्त्यावर बेशिस्त वाहने उभी केल्यामुळे वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हे वाइन शॉप दुसरीकडे हलवावे, अशी मागणी नागरिकांकडून अनेक वर्षांपासून होत आहे. यासाठी आंदोलनही करण्यात आले होते. परंतु त्यावेळी सात ते आठ दिवस दुकान बंद केले, पण त्यानंतर ते पुन्हा सुरू झाले.
सदर वाइन शॉप स्थलांतरित करण्याबाबतचे पत्र पाच महिन्यांपूर्वीच उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांना देण्यात आलेले आहे. परंतु, त्यांच्याकडून अद्याप याबाबत कोणतेही उत्तर प्राप्त झालेले नाही. तसेच, नागरिकांची समस्या लक्षात घेऊन परिसरातील रस्त्याच्या कडेला दारू पिणाऱ्यांवर कारवाई केली जाते. तसेच मार्शल पाठवून पेट्रोलिंगही सुरू आहे.
- चंद्रशेखर सावंत, पोलिस निरीक्षक, बाणेर पोलिस ठाणे
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या समस्येने त्रस्त आहोत. त्याकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाही. निवडणुका येतात आणि जातात, पण आम्हाला आश्वासनाशिवाय काहीच मिळत नाही. त्यामुळे मत मागायला येणाऱ्या उमेदवारांसाठी हा फलक लावला आहे. ही समस्या सोडविणाऱ्या उमेदवारालाच मतदान करणार आहोत.- रहिवासी, साई सिलिकॉन व्हॅली
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.