भाजपच्या स्वप्नाला राज्य शासनाच्या नव्या आदेशाने सुरूंग, उपनगराध्यक्षही होणार नाही; नितेश राणेंना होमपिचवरच दुसऱ्यांदा धक्का
येथील नगरपंचायतीचा उपनगराध्यक्ष आणि दोन स्वीकृत नगरसेवकांची निवड प्रक्रिया १३ जानेवारीला होणार आहे. यात उपनगराध्यक्षपदासाठी शहर विकास आघाडीकडून सुशांत नाईक यांचे नाव निश्चित झाले आहे. तर नगरपंचायतीमध्ये बहुमत असूनही भाजपकडून उमेदवाराचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. यामुळे भाजप अजूनही संभ्रमात असल्याची येथे चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, याच सभेत दोन स्वीकृत नगरसेवकांचीही नियुक्ती होणार असून शहर विकास आघाडी आणि भाजप गटाकडून प्रत्येकी एक सदस्याला संधी दिली जाणार आहे. भाजपकडून माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचे नाव सध्या चर्चेत असून शहर विकास आघाडीकडून शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्याला संधी दिली जाण्याची चर्चा आहे.
नगराध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष निवडणुकीचे पीठासीन अधिकारी संदेश पारकर यांनी मंगळवारी (ता.१३) नगरपंचायतीची पहिली सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. यात उपनगराध्यक्ष निवडीसह दोन स्वीकृत नगरसेवक नगरपंचायतीमध्ये नियुक्त होणार आहेत. नगरपंचायतीमध्ये एकूण १७ सदस्यांपैकी भाजपकडे ९ आणि शहर विकास आघाडीकडे ८ असे संख्याबळ आहे.
त्यामुळे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचाच उपनगराध्यक्ष होणार अशी चर्चा होती. मात्र, राज्य शासनाने २६ डिसेंबरला उपनगराध्यक्ष निवडीबाबत एक अध्यादेश काढला. यात नगराध्यक्षांना सदस्य म्हणून एक मत आणि समसमान मते पडल्यास एक निर्णायक अशा दोन मतांचा अधिकार बहाल केला.या अध्यादेशानुसार शहर विकास आघाडीकडे ८ संख्याबळ असले, तरी नगराध्यक्षांचे एक मत असे ९ संख्याबळ होते. तर भाजपकडेही ९ सदस्य आहेत. त्यामुळे समसमान मते झाल्यास नगराध्यक्षांनी निर्णायक मताचा वापर केला, तर शहर विकास आघाडीचाच उपनगराध्यक्ष होणार हे निश्चित झाले आहे.कणकवली नगरपंचायतीमध्ये शहर विकास आघाडीचा उपनगराध्यक्ष होणार हे निश्चित झाले असले, तरी भाजपनेही उपनगराध्यक्ष निवडणुकीची तयारी केली आहे. मात्र, उपनगराध्यक्षपदासाठी भाजपकडून नावाची निश्चिती झाली नाही. यामुळे पुन्हा एकदा राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांना होमपिचवरच दुसऱ्यांदा संदेश पारकर यांच्याकडून धक्का मिळणार आहे.
दरम्यान, कणकवली नगरपंचायतीमध्ये दोन स्वीकृत नगरसेवक नियुक्त होणार आहेत. यात भाजप आणि शहर विकास आघाडीकडून प्रत्येकी एक सदस्य नियुक्त होणार आहे. यात भाजपकडून माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचे नाव निश्चित मानले जात आहे. तर शहर विकास आघाडीकडून शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्याला नगरसेवक होण्याची संधी मिळणार असल्याची चर्चा आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.