मुंबई : महाराष्ट्र सरकारने बीएमसी निवडणूक आणि इतर २९ महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुढील गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांसह २९ महानगरपालिका क्षेत्रांना लागू असेल.
मतदानाची वेळ-वार काय?
या सुट्टीमुळे मुंबईतील शेअर बाजार बंद राहण्याची शक्यता आहे. मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तसेच मुंबईसाठीच्या आरबीआयच्या सुट्ट्यांच्या यादीत १५ जानेवारीचा समावेश नाही. पुढील गुरुवार १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.
खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांबाबत काय निर्णय?
खाजगी क्षेत्रातील नोकरदारांच्या सुट्टीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. संबंधित संस्थांना आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी द्यायची की नाही, हे घेण्याचा अधिकार आहे. काही संस्था आपल्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सकाळी किंवा संध्याकाळी दोन तास सूट देण्याचा निर्णय घेऊ शकतात.
१६ जानेवारी रोजी निकाल
राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी एकाच टप्प्यात घेण्याची घोषणा केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर केला जाईल. आशियातील सर्वात मोठी नागरी संस्था असलेल्या बीएमसीसाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक ७४,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
मुंबई महापालिकेत किती मतदार?
बीएमसी निवडणुकीत एकूण १,०३,४४,३१५ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये ५५,१६,७०७ पुरुष मतदार, ४८,२६,५०९ महिला मतदार आणि १,०९९ इतर मतदारांचा समावेश आहे. २०१७ च्या निवडणुकीत अखंड शिवसेनेने ८४ जागा जिंकल्या होत्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.