Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप

सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युती सरकारच्या काळातील सिंचन घोटाळ्याच्या फाईलचा उल्लेख केल्यानंतर, जलसंपदा विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी त्यांच्यासह संपूर्ण राजकीय व्यवस्थेवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. विजय पांढरे यांनी सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झाल्याचा गंभीर आरोप केला. गेल्या 70 वर्षांत काँग्रेस सरकारने जेवढा भ्रष्टाचार केला नसेल, तेवढा भ्रष्टाचार भाजपच्या लोकांनी 10 वर्षांत केला असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगणमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलं जात असल्याचे ते म्हणाले.

भ्रष्टाचाराची कबुली दिली

विजय पांढरे म्हणाले की, अजित पवार स्वतःच्या तोंडाने त्यांच्या खात्यातल्या भ्रष्टाचाराची कबुली देत आहेत, ही एक चांगलीच गोष्ट आहे. पुरंदर उपसा सिंचन योजनेबाबत अजित पवार 110 कोटींचा आकडा सांगत असले, तरी प्रत्यक्षात हा प्रकार कृष्णा खोऱ्यातील अनेक योजनांमध्ये घडला असून हा आकडा हजारो कोटींचा असल्याचे ते म्हणाले.जो पाया भाजपने (युती सरकारने) कृष्णा खोऱ्यात रचला, त्या पायावर भ्रष्टाचाराची प्रचंड इमारत पुढे अजित पवारांनीच बांधली आहे, असा थेट आरोप पांढरे यांनी केला. कृष्णा खोऱ्यानंतर तापी, नागपूर, मराठवाडा आणि कोकण महामंडळांमधील भ्रष्टाचाराला प्रचंड रूप देण्याचे काम अजित पवारांनीच केले, कारण पुढील अनेक वर्षे या खात्यावर त्यांचेच नियंत्रण होते, असे ते म्हणाले.

अजित पवारांचा भ्रष्टाचार फडणवीस, मोदींनी झाकला
विजय पांढरे म्हणाले की, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे दोन्ही मोठे महाचोर आहेत. ते एकमेकांचा भ्रष्टाचार झाकत असतात. अजित पवारांचा भ्रष्टाचार फडणवीस आणि मोदींनी झाकला आहे, आणि आता ही सर्व लुटारूंची टोळी मांडीला मांडी लावून बसली आहे. अनेक प्रकल्पांचे अंदाजपत्रक कोणत्याही सर्वेक्षणाशिवाय किंवा पाहणीशिवाय बनवले गेले. निविदा स्वीकारल्यानंतर सर्वे आणि डिझाइन करण्यात आले, ज्यातून किमती वाटेल तशा वाढवण्यात आल्या. पुरंदरसारखे असे 100 पेक्षा जास्त प्रकल्प जिथे मोठे घोटाळे झाले आहेत, असे ते म्हणाले. विजय पांढरे यांनी घोटाळ्याची  पद्धतही सांगितली. ते म्हणाले, काही चापलूस अधिकारी मंत्र्यांना पैसे कसे खायचे हे शिकवतात. जे अधिकारी ऐकत नाहीत, त्यांना बदल्यांची भीती घातली जाते किंवा त्यांचे करिअर खराब केले जाते. अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगणमताने महाराष्ट्राला लुटले जात आहे. चितळे कमिटीने हाय पॉवर कमिटी नेमून चौकशी करण्याची शिफारस केली होती आणि सरकारने ती स्वीकारली होती, तरीही प्रत्यक्षात हे सर्व दाबण्याचे काम झाले असून फडणवीसांनी क्लीन चिट दिली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.