Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप? भाजपाची विरोधात बसण्याची तयारी; शिंदेंना अजून एक धक्का

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप? भाजपाची विरोधात बसण्याची तयारी; शिंदेंना अजून एक धक्का


राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महापालिका निवडणुकीमध्ये विधानसभा आणि लोकसभेप्रमाणे स्ट्राइक रेट कायम ठेवता आलेला नाही. मात्र शिंदेंच्या पक्षाला एकहाती सत्ता मिळालेली ठाणे महानगरपालिका ही सर्वात मोठी महापालिका ठरली आहे. एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये शिंदेंचा पक्ष भाजपपेक्षा दुप्पटीहून अधिक जागांवर लढला होता. या ठिकाणी उद्धव ठाकरेंचा केवळ एक उमेदवार निवडून आला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 75 जागा जिंकल्या आहेत. यापैकी 6 जागा बिनविरोध आहेत. भाजपाने 28 जागा जिंकल्या असून शरद पवारांच्या पक्षाने 12 जागा जिंकल्या आहेत. याप्रमाणे अजित पवारांच्या पक्षाने 9 आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाने केवळ एक जागा जिंकली आहे. एमआयएम आणि इतरांकडे 6 जागा आहेत. युतीने 131 पैकी 103 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. मात्र आता भाजपाने युतीमध्ये लढल्यानंतर विरोधात बसण्याची तयारीही दर्शवत सर्वांनाच धक्का दिला आहे.


भाजपाने पाच अधिक जागा जिंकल्या

ठाण्यामध्ये भाजपाचे खासदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जी युती आम्ही केली होती 40 ठिकाणी आम्ही लढलो. आमचा एक उमेदवार लढू शकला नाही. युतीमध्ये लढत असताना 13 ठिकाणी यश आले आहे. मुंबई महानगरपालिकेमधील कळवा-मुंब्रा भाग वगळता सगळीकडे कमळ फुले. मुस्लिम बहुल भागात देखील निवडून येईल अशी आमची अपेक्षा होती. आम्ही 28 जागा जिंकल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार राजन विचारे यांच्या पत्नी ज्या भागातून लढल्या तिथेही आम्ही विजय मिळवला आहे. इतकेच काय तर 7 नंबर प्रभागामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष समोर असतानाही आम्ही विजय मिळवला आहे. 2017 मध्ये आमच्या 23 जागा होत्या आता त्यात वाढ झाली आहे. 5 नवीन जागांची भर त्यात पडली आहे. आम्ही नव्या चेहऱ्यांना संधी दिली आणि त्यांनी यश संपादन केलं. हे संघटन कौशल्याचे यश आहे. आम्ही ज्या ठिकाणी एकत्र लढतो तिथे एकत्रच राहू, असं केळकर यांनी स्पष्ट केलं आहे.

...तर विरोधातही बसू
सत्ता अमर्याद नसावी. प्रत्येकावर अंकुश ठेवणारी एक शक्ती लागते. आम्ही हा देखील विचार करू शकतो आम्ही वेगळ्या माध्यमातून लढलो. वेळ पडली तर आम्हाला घ्या सोबत असं आम्ही त्यांना विचारले नाही. आम्ही वेगळा विचार करू शकतो, असं म्हणत भाजपाने थेट विरोधात बसण्याची तयारी दर्शवली आहे. आम्ही अंकुश ठेवण्याचे काम करू शकतो. आम्ही महापौर पदासाठी चर्चा करायला जाणार नाही ते आले तर त्यावर निश्चित बोलू. आता डोक्यावरून पाणी निघून गेले आहे. जेव्हा बोलायचे तेव्हा आम्ही बोललो. मुख्यमंत्र्यांना देखील सांगितले आहे. जर तर आता काही नाही, असं संजय केळकर यांनी म्हटलं आहे.
आश्वासनं पूर्ण करु

आम्ही निर्धारनाम्यात जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करू. आम्ही तीच भूमिका घेऊ. पक्ष लवकरच यासंदर्भातील भूमिका स्पष्ट करेल, असं निरंजन डावखरेंनी सांगितलं आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.