Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"लोकनेते अजित पवारांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक अन् दुःखद": पंतप्रधान नरेंद्र मोदी

"लोकनेते अजित पवारांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक अन् दुःखद": पंतप्रधान नरेंद्र मोदी


महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभा घेण्यासाठी अजित पवार मुंबईहून बारामती येथे जात होते.


सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी बारामती विमानतळाजवळ उतरताना अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर विमानाला मोठी आग लागली. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शोकसागरात बुडाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून बारामती विमान अपघाताबाबत माहिती घेतली होती. अजित पवारांच्या निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त केला.

एक्सवर एक ट्विट करत पंतप्रधान मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. अजित पवार हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य कार्यकर्त्यांप्रति शोकसंवेदना. ॐ शांती., असे पंतप्रधान मोदी यांनी शोक संदेशात म्हटले आहे.

संपूर्ण एनडीए शोकाकुल पवार कुटुंबासोबत खंबीरपणे उभे

आज, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे ज्येष्ठ एनडीए सहकारी अजित पवार यांचे एका दुःखद अपघातात निधन झाल्याच्या बातमीने मला खूप दुःख झाले आहे. गेल्या साडेतीन दशकांपासून महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी अजित पवार यांनी केलेले समर्पण शब्दात व्यक्त करता येणार नाही. आम्ही जेव्हा जेव्हा भेटायचो तेव्हा ते महाराष्ट्रातील लोकांच्या कल्याणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर दीर्घ चर्चा करत असत. त्यांचे निधन हे माझे तसेच एनडीए कुटुंबाचे वैयक्तिक नुकसान आहे. मी पवार कुटुंबाप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. या दुःखाच्या वेळी, संपूर्ण एनडीए शोकाकुल पवार कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. ओम शांती शांती शांती, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

अजित पवार यांचा मृत्यू दुर्दैवी
अजित पवार यांचा मृत्यू दुर्दैवी आहे. ते राजकारणात माझे जवळचे मित्र होते आणि आमचे कौटुंबिक संबंधही होते. त्यांचे निधन ही एक मोठी हानी आहे. पक्षाच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, अशी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

अजित पवारांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सहप्रवाशांचे विमान अपघातात निधन झाल्याची माहिती अत्यंत वेदनादायक आहे. या कठीण, दुःखद प्रसंगी महाराष्ट्राच्या जनतेसोबत आहे. संपूर्ण पवार कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त करतो, असे काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनावर काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी शोक व्यक्त केला. मी संपूर्ण पवार कुटुंब आणि त्यांच्या समर्थकांप्रति शोक व्यक्त करते. मी अजित पवार यांच्या पत्नी आणि सुप्रिया सुळे यांच्याशी बोलले आहे.
एक अनुभवी राजकारणी म्हणून स्मरणात राहतील

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शोक व्यक्त करताना म्हटले की, विमान अपघातात अजित पवार यांच्या दुःखद निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी आहे. हे एका अशा नेत्याचे अकाली निधन आहे, ज्यांच्यासमोर एक दीर्घ आणि उज्ज्वल राजकीय कारकीर्द होती. या कठीण प्रसंगी शोकाकुल कुटुंब ज्या अपार दुःखातून जात असेल, ते व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. मी संपूर्ण पवार कुटुंब, त्यांचे समर्थक आणि हितचिंतकांना माझ्या संवेदना व्यक्त करतो. महाराष्ट्राच्या जनतेची विविध घटनात्मक पदांवरून सेवा केलेले अजित पवार हे एक अनुभवी राजकारणी म्हणून स्मरणात राहतील, ज्यांनी आपल्या लोकांप्रति आपली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि कौशल्याने पार पाडली. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूवर द्रमुकचे प्रवक्ते टी.के.एस. एलंगोवन म्हणाले की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. कदाचित नागरी विमान वाहतूक तज्ञ यावर अहवाल जारी करतील. पण हे देशाचे मोठे नुकसान आहे... मी त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.