पुणे : पुणे शहरातील सदाशिव पेठ परिसरात एका नामांकित औषध वितरकाची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात तब्बल 3 कोटी 54 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे शहरातील औषध व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
सदाशिव पेठेतील सिनिअर एजन्सीचे मालक दिनेश कर्नावट हे औषध वितरणाचा व्यवसाय करतात. आरोपी सोनाली लक्ष्मण गिरीगोसावी हिने सुरुवातीला त्यांच्या एजन्सीकडून रोखीने औषधे खरेदी केली. वेळेवर पैसे दिल्यामुळे तिने कर्नावट यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिने जयेश वसंत जैन याला उधारीवर औषधे देण्याची विनंती केली आणि त्याचे पैसे आपण देणार असल्याचे सांगितले.या विश्वासावर 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत आरोपींनी टप्प्याटप्प्याने मोठ्या प्रमाणात औषधे उचलली. एकूण 3 कोटी 54 लाख 55 हजार 329 रुपयांचा माल घेतल्यानंतरही त्याचे पैसे देण्यात आले नाहीत. वारंवार मागणी करूनही पैसे न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कर्नावट यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या दोघांविरुद्ध पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये आतापर्यंत चार गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्व प्रकरणांमधील फसवणुकीची रक्कम 18 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. न्यायालयाने या दोघांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले असले तरी आरोपी अद्याप फरार आहेत. या प्रकरणाचा तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जानराव करत आहेत. औषध व्यवसायात अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने वितरकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.