सांगली : सोशल मीडियावरील संभाषणाचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. असे कृत्य करणारा संशयितही अल्पवयीन असून त्याच्या विरोधात विश्रामबाग पोलिसांनी सुधारित बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही शिक्षण घेत असून ती शिक्षणाच्या निमित्ताने नेहमी सांगलीत येत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या अल्पवयीन मुलाने तिच्याशी वर्षभरापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून संभाषण सुरू ठेवले होते. तिच्या घरापासून तो तिचा दुचाकीवरून सतत पाठलाग करत होता. तिला आपल्याबरोबर फिरायला येण्याची गळ घालत होता. दोन दिवसापूर्वी त्याने तिला गाठून तू माझ्याबरोबर फिरायला आली नाहीस तर सोशल मीडियावरील संभाषणाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तू मला आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. आत्ताच माझ्याबरोबर फिरायला चल म्हणत तिचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य संशयिताने केले. हा प्रकार समोर आल्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी विश्रामबाग पोलिसात संशयिताच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.