पुणे : 'भारतीय जनता पक्षाकडून पुण्यातील गुन्हेगारी संपवण्याऐवजी खतपाणी घातले जात आहे. त्यामुळे 'पुण्याचा डान्सबार होऊ नये, गुन्हेगारांचे पुणे होऊ नये, यासाठी पुणेकरांना खबरदारी घ्यावी,' अशा शब्दांत शिवसेना (शिंदे) पक्षाचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली. चंद्रकांत पाटील एका गुंडासोबत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमावर दिसून येत असून आता भाजपचे निवडणूक प्रमुखही डान्सबारमध्ये बसले असून अनेक पुरावे, चित्रफिती माझ्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला.
महानगरपालिका निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती सरकारमधील तिन्ही पक्ष वेगवेगळे लढत असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर धंगेकर यांनी दोन दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर प्रसारित झालेल्या चित्रफितींबाबत 'एक्स'माध्यमावर भाजपच्या नेत्यांना प्रश्न विचारत राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना आव्हान दिले होते. त्या पार्श्वभूमीवर धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले.धंगेकर म्हणाले, 'एकीकडे गुंडाबरोबर संपर्क असल्याचे सांगून उमेदवारी नाकारली असल्याचे सांगायचे. मात्र, भाजपचेच नेते पुणेकरांना लुटण्याचा प्रयत्न करत आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील हे गुंडांसोबत पाहायला मिळतात, तर निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांची डान्सबारमधील चित्रफीतही पुढे आली आहे. याबाबत माझ्याकडे अनेक चित्रफिती आणि पुरावे असून मला कोणावर व्यक्तिगत टीका करायची नाही. मात्र, पाटील आणि केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत खुलासा करावा.'
एकनाथ शिंदेंची आश्वासने पूर्ण करणार
'राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 'लाडकी बहीण योजना' आणली. त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे. महिलांना पैसे मिळत आहेत. आता पुणे शहरातील जुन्या वाड्यांबाबतचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी आश्वासन दिले आहे. तसेच जुन्या वाड्यांमध्ये लावण्यात आलेले पाण्याचे मीटर काढण्यात येणार आहे. नगरविकास खातेही त्यांच्याकडे असल्याने पुणे शहरातील झोपडपट्टी पुढील दहा वर्षात काढून टाकत लोकांना हक्काचे घरे देण्यात येणार आहे. शहराच्या विकासासाठी जास्तीजास्त निधी पुण्यासाठी देण्यात येणार असल्याचा शब्दही त्यांनी दिला असून पुणेकरांनी विचार करावा, असे धंगेकर यांनी सांगितले. पुण्यातील वाढत्या गुंडगिरीविरोधात सर्वांनीच एकत्र येऊन बिमोड केला पाहिजे. भाजप निवडणुकीच्या तोंडावर आम्ही गुंडगिरीविरोधात असल्याचे सांगत आहे. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. – रवींद्र धंगेकर, महानगरप्रमुख, शिवसेना (शिंदे)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.