सांगलीतून जयंत पाटलांचा निवडणूक आयोगावर निशाणा; पाडू यंत्राच्या वापराबाबत माहिती न दिल्याने व्यक्त केली नाराजी
सांगली : मुंबईत वापरण्याात येत असलेल्या पाडू यंत्राचा वापर राजकीय पक्षांना माहिती न देता करणे हा निवडणूक आयोगाचा गलथानपणाच असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी गुरूवारी सांगलीत व्यक्त केले.
महापालिका निवडणुकीतील मतदानाचा आढावा आ. पाटील यांनी विविध मतदान केंद्रावर जाउन घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, निवडणुकीमध्ये पैशाचा वापर आता सर्वश्रुत झाले आहे. पहिल्यासारख्या आता निवडणुका होत नाहीत. मधल्या काळात ज्या पध्दतीने काही राजकीय घडामोडी घडल्या, त्या पाहता आता निवडणुक पध्दतीचा बांधच फुटला असल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. निवडणुकीत पाडू यंत्राचा वापर कशासाठी केला जाणार आहे हे राजकीय पक्षांना सांगण्याची गरज भासली नाही यावरून निवडणुक आयोगाचा गलथानपणा समोर येतो. वास्तविकता सर्व राजकीय पक्षांना बोलावून पाडू यंत्र कशासाठी वापरले जाणार आहे, उपयोग काय याची माहिती द्यायला हवी होती. यामुळे उद्या काही लोक न्यायालयात जाउ शकतात असेही ते म्हणाले. सांगली महापालिकेच्या गेल्या दहा वर्षाच्या कारभारावर येथील मतदार नाराज आहे. नाराजीची लाट प्रचारावेळी आपणास जाणवली असून यामुळे या वेळी मतदार महाविकास आघाडीच्या हाती सत्तासुत्रे देतील असा विश्वास आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी व्यक्त केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.