चपळूण : राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. मात्र एकीकडे प्रचार सुरू असतानाच दुसरीकडे भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी रविवारी (04 जानेवारी) राजकीय निवृत्तीचे संकेत दिले होते. "आता घरी बसायचे ठरवलंय, दोन्ही मुलांना सांगेन… नांदा सौख्यभरे…" असे भावनिक उद्गार त्यांनी सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमात काढले. यानंतर आज (05 जानेवारी) चिपळूण येथे आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात भाषण करताना नारायण राणेंना अचानक भोवळ आली. त्यामुळे सर्वांची धावपळ उडाल्याचं पाहायला मिळाले.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे सध्या 'कृषी महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या कार्यक्रमाला नारायण राणे उपस्थित होते. व्यासपीठावरून भाषण करत असताना नारायण राणे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. महत्त्वाचे म्हणजे आपल्या भाषणाच्या अखेरच्या टप्प्यात नारायण राणे यांचा आवाजही बसला होता, त्यामुळे त्यांनी आपले भाषण आटोपते घेतले. यानंतर त्यांना भोवळ आली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांना तातडीने आधार दिला. या घटनेनंतर नारायण राणे यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आणि ते थेट कार्यक्रमाच्या ठिकाणाहून त्यांच्या गेस्ट हाऊसकडे रवाना झाले. मात्र काल निवृत्तीचे संकेत आणि आज नारायण राणे यांची तब्येत बिघडल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.सिंधुदुर्गात रविवारी (4 जानेवारी) नारायण राणे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावरून बोलताना नारायण राणे म्हणाले होते की, वय जसे वाढत जाते, तसे शरीर थकत आहे. दोन्ही मुले राजकारणात सेट झाल्यानंतर बिझनेसकडे कुणीतरी लक्ष द्यायला पाहिजे. कारण राजकारणात कट कारस्थान केले जात आहे, त्यामुळे आता ठरवले आहे की, घरी बसायचे. दोन्ही मुले राजकारणात चांगलं काम करत आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा चांगल्या राजकीय नेत्यांना जोपासा आणि त्यांच्याकडून सेवा करून घ्या. माझ्यानंतर विकासात्मक राजकारण निलेश आणि नितेश करतील. त्यांनी हाक दिल्यावर ओ द्या, असे आवाहन देखील नारायण राणे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.