नवी मुंबई: शहरात जबरी चोरी, लुटमारीचे गुन्हे घडत असतानाच जुईनगरमध्ये तरुणाच्या गळ्यावर वार करून ५० हजार रुपये लुटल्याची घटना घडली. तपासादरम्यान कसलाच सुगावा हाती न लागल्याने पोलिसांनी तक्रारदाराचीच उलट चौकशी केली असता गुन्ह्याची उकल झाली. कौटुंबिक गरज भागवण्यासाठी हल्ल्याचा बनाव केल्याची त्याने कबुली दिली.
नेरूळ परिसरात राहणाऱ्या ३४ वर्षीय तरुणाने स्वतःवर हल्ला करून ५० CRIME CO हजार रुपये लुटल्याची तक्रार पोलिसांकडे केली. या प्रकरणी सानपाडा पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेचे पथक, स्थानिक पोलिसांसह फॉरेन्सिक पथकाने तपास सुरू केला. घटनास्थळी पंचनामा करून सर्व पथके हल्लेखोरांचा शोध घेऊ लागले. सलग २४ तास घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसरात बारकाईने तपास केला. त्यात तक्रारदाराने वर्णन केलेले ना वाहन दिसले, ना संशयास्पद हालचाली सीसीटीव्हीत दिसून आल्या.
उलट चौकशीत गुन्ह्याची कबुली
सोमवारी सकाळी पोलिसांनी तक्रारदाराची उलट चौकशी केली असता त्याने हल्ल्याचा बनाव केल्याची कबुली दिली. तक्रारदार तरुण कुरिअर कंपनीत कामाला असून, त्याच्याकडे कंपनीचे ५० हजार रुपये होते. शनिवारी रात्री ही रक्कम तो सोबत घेऊन घरी चालला होता. घरची गरज भागवण्यासाठी त्याने ती उपयोगी आणण्याचा विचार केला. त्यासाठी आपल्यावर हल्ला करून अज्ञातांनी रोकड लुटल्याचा बनाव त्याने रचला. त्यासाठी निर्मनुष्य ठिकाणी जाऊन गळ्यावर वार करून रुग्णालयातही दाखल झाला. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतरही तो पोलिसांकडे तक्रार करावी की नाही या संभ्रमात होता. परंतु, परिस्थितीपुढे हतबल होऊन त्याने अखेर रविवारी सकाळी पोलिसांकडे तक्रार केली.
सहा जणांनी लुटल्याचा आरोप
हल्ल्यासाठी केलेल्या बनावात स्वतःच्या गळ्यावर वार करताना थोड्याशा फरकाने त्याचे प्राणही जाऊ शकले असते. यानंतरही त्याने स्वतःच्या जिवावर उदार होऊन पैशाची गरज भागविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अज्ञात सहा जणांनी निर्मनुष्य ठिकाणी अडवून आपला गळा कापला व ५० हजारांची रोकड लुटल्याची तक्रार केली. मात्र, गुन्ह्याच्या मुळाशी पोहोचण्याच्या पोलिसांच्या जिद्दीपुढे त्याचा बनाव फार काळ टिकला नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.