पेडणे (गोवा): मोरजी व हरमल येथे रशियन महिलांच्या निघृण खून प्रकरणामुळे गोव्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील संशयित आलेक्सेई लिओनोव याने पोलिस चौकशीत आणखी १५ महिलांना 'मोक्ष' दिल्याचा दावा केल्याने पोलिसांनी तपासचक्रे गतिमान केली आहेत. पैशांसाठीच आलेक्सेई रशियन महिलांशी मैत्री करायचा. नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून खून करत होता.
किलरचा प्लान...
आरोपी आलेक्सेई पैशांसाठी महिलांचा खून करत असल्याचे त्याच्या चौकशीतून उघड झाले आहे. तो रशियन महिलांना हेरून प्रेमाच्या जाळ्यात ओढत असे. त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करून त्यांच्याकडून चलाखीने पैसे उकळत असे. मात्र, महिला अन्य व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे समजताच तो तिचा खून करत असे.
किनारी भागात झाडाझडती
रशियन किलर आलेक्सेई याने १५ खून केल्याचा दावा केल्याने तपासात पोलिस चक्रावले आहेत. तर कोठडीत चौकशीवेळी संशयित विधाने बदल असल्याने प्रकरणाची गुंतागुंत वाढत आहे. पोलिसांनी या प्रकरणात सावधगिरी बाळगत किनारी भागात झाडाझडती मोहीम सुरू केली आहे. आरोपी राहात असलेल्या खोल्यांची तपासणी केली जात आहे. आलेक्सेई हा कुठे राहात होता याचाही शोध पोलिस घेत आहेत. २ दिवसांपासून पोलिसांनी दिवसरात्र विविध भागात तपास केला. हिमाचल प्रदेशमधील पोलिसांशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती मिळते.
१५ महिलांचे खून केल्याची कबुली
पेडणे तालुक्यातील बामनभाटी-हरमल येथील एलिना (वय ३५) हिचा गळा चिरून खून केला. त्यानंतर काही तासांत मोरजी येथेही खुनाची घटना उघडकीस आली. ३७ वर्षीय एलिना वानिवा या रशियन महिलेचा बाथरूममध्ये नग्न अवस्थेत गळा चिरून खून केल्याचे समोर आले. मांद्रे पोलिसांनी या प्रकरणात आलेक्सेई याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हे दोन्ही खून आपणच केल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर गोव्यासह हिमाचल प्रदेश या ठिकाणी मिळून १५ महिलांचे खून केल्याचा दावाही त्याने केला आहे. याबाबत मांद्रेचे पोलिस निरीक्षक गिरेंद्र नाईक यांनी सांगितले की, सध्या फक्त दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत. परंतु संशयिताची कबुली पूर्ण नसल्यामुळे आम्ही चौकशी करत आहोत. त्याने आपण आणखी खून केल्याचे सांगितले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.