पोलीस दलात अधिकारी म्हणून उज्ज्वल भविष्य घडवण्याची स्वप्ने पाहणाऱ्या एका तरुण अधिकाऱ्याने आपले आयुष्य अकाली संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तासगाव पोलीस ठाण्यात प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले सुरज मराठे यांनी पुणे येथे विषप्राशन करून आत्महत्या केली.
आळंदी (ता. खेड, जि. पुणे) येथील रहिवासी असलेले सुरज मराठे हे नुकतेच पोलीस सेवेत रुजू झाले होते. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून ते तासगाव पोलीस ठाण्यात प्रशिक्षण घेत होते. कर्तव्यनिष्ठ, शांत स्वभावाचे आणि अभ्यासू अधिकारी अशी त्यांची ओळख होती, अशी माहिती सहकाऱ्यांनी दिली. सुरज मराठे हे अविवाहित होते. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ते रजेवर होते. आज सकाळी त्यांनी अचानक टोकाचे पाऊल उचलत विषप्राशन केले. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत असून, एका होतकरु अधिकाऱ्याचे असे अकाली जाणे संपूर्ण व्यवस्थेसाठी अंतर्मुख करणारी घटना असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. घटनेचा पुढील तपास सुरु आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.