राज्यात २९ महापालिका निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. मात्र, राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम कधी जाहीर होणार याची उत्सुकताही तितकीच लागली आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आयोगाकडून कार्यक्रम जाहीर केला जाईल, अशी अंदाज व्यक्त केला जात होता. पण सुप्रीम कोर्टाने दिलेली डेडलाईन संपण्यास आता केवळ २४ दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यातच एक मोठी अपडेट समोर आली आहे.
सुप्रीम कोर्टाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा कोर्टाच्या आदेशाचा अवमान होऊ शकतो. त्यानुसार आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका घेतल्या. महापालिका निवडणुकांची प्रक्रियाही सुरू आहे. आता आयोगाकडून पुढील दोन दिवसांत जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रमही जाहीर केला जाऊ शकतो.
आयोगाकडून आज मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळता राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वच्छ, पारदर्शक, मोकळ्या व भयमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी आदेश जारी केले आहेत. त्यामुळे आयोगाकडून लवकरच झेडपी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो, या चर्चांना उधाण आले आहे.महापालिका निवडणुकांसाठी १ डिसेंबरला दिलेले आदेशच आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांनाही दिले आहेत. या आदेशामध्ये निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलीस व इतर विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, निवडणूक प्रक्रिया कर्तव्यतक्ष व नि:पक्ष अधिकाऱ्यांमार्फत हाताळण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
दरम्यान, राज्यातील १२ जिल्हा परिषदा वगळता इतर जिल्हा परिषदांसाठी जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणाच्या सोडतीमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या पुढे गेली. या जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्यास कोर्टाने मनाई केली आहे. त्यामुळे आयोगाकडून केवळ १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. तर उर्वरित निवडणुकांबाबत २१ जानेवारीला सप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीनंतर निर्णय घेतला जाईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.