शासनाची भन्नाट योजना! शेतमजूर अन् शेतकऱ्यांना अवघ्या २५ टक्के रकमेत ४ शेळ्या अन् १ बोकड; २४ जानेवारीपर्यंत करा अर्ज, कागदपत्रे कोणती लागतात? वाचा...
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या शेतकरी व शेतमजुरांना ७५ टक्के अनुदानावर चार शेळ्या व एक बोकड मिळणार आहे. त्यासाठी ५ ते २४ जानेवारीपर्यंत पात्र लाभार्थींना अर्ज करावा लागणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या शेतमजूर व शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर चार शेळ्या व एक बोकड आणि ५० टक्के अनुदानावर मिल्किंग मशिन देणाऱ्या योजनेसाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने अर्ज मागविले आहेत. पंचायत समिती स्तरावर त्यांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर ते अर्ज जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाला पाठविले जातील. त्याठिकाणी छाननी होऊन निवड समितीमार्फत लाभार्थींची निवड होईल.अर्जाचा नमुना सोलापूर जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे आवाहन जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन विभागातील उपायुक्त डॉ. व्ही. डी. येवले यांनी केले आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या शेतमजूर व शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी मदत व्हावी, हा योजनेमागील हेतू आहे. लाभार्थीस केवळ २५ टक्के रक्कम भरल्यावर चार शेळ्या व एक बोकड मिळणार आहे. त्या अर्जातील संपूर्ण माहिती वस्तुनिष्ठ भरावी लागणार आहे. तहसीलदारांकडील उत्पन्नाचा दाखला अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे, कारण आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या शेतकरी व शेतमजुरीसाठी ही योजना आहे.
योजनेच्या अर्जासाठी लागतात 'ही' कागदपत्रे
फोटो ओळखपत्र, दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र, सातबारा, आठ-अ, ग्रामपंचायत नमुना नं-आठ, प्रशिक्षण प्रमाणपत्र (असल्यास), जात प्रमाणपत्र, बचत सदस्य प्रमाणपत्र (असल्यास), रोजगार-स्वयंरोजगार कार्यालयाचे नावनोंदणी कार्ड (असल्यास), अपत्य दाखला (ग्रामपंचायतीचा किंवा स्वयंघोषणापत्र), शौचालय प्रमाणपत्र किंवा स्वंयघोषणापत्र, रेशनकार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र अशी कागदपत्रे जोडून अर्ज करावा लागणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.