वर पाण्याचे बॉक्स, आत देशी दारूचा साठा! कागलमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचा 'सर्जिकल स्ट्राईक'; ZP निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
कोल्हापूर: जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोल्हापुरात मोठी धडक कारवाई करत तब्बल 62.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत गोव्यात तयार होणारी आणि महाराष्ट्राचे लेबल लावून बेकायदेशीर विक्रीसाठी नेली जाणारी सुमारे 40 लाख रुपयांची देशी दारू पकडण्यात आली आहे. ही दारू नागपूर जिल्ह्यात विक्रीसाठी नेली जात असल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कागल विभागाला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार देवगड-निपाणी राज्य महामार्गावरील बसवडे फाटा (ता. कागल) येथे सापळा रचण्यात आला होता. यावेळी MH-40-CM-2535 क्रमांकाच्या टाटा मोटर्स कंपनीच्या ट्रकची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ट्रकच्या पुढील भागात देशी दारूचे बॉक्स तर मागील बाजूस पिण्याच्या पाण्याचे बॉक्स लपवून ठेवलेले आढळून आले.
तपासणीमध्ये 'रॉकेट देशीदारू संघ' या ब्रँडचे एकूण 1000 बॉक्स आढळले. प्रत्येक बॉक्समध्ये 90 मिली क्षमतेच्या 100 बाटल्या असल्याने एकूण 9 लाख देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. बाटल्यांवर प्रकार डिस्टिलरी प्रा. लि., राहाता, जि. अहमदनगर असा उल्लेख असला तरी प्राथमिक चौकशीत ही दारू गोव्यात तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
या कारवाईत दारू, पाण्याचे बॉक्स, ट्रक, मोबाईल फोन आणि कागदी बॉक्स असा एकूण 62,50,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ट्रकची किंमत सुमारे 20 लाख रुपये आहे.
या प्रकरणी ट्रक चालक सलीम खयूम शेख (रा. आदिलाबाद, तेलंगणा, सध्या यवतमाळ) आणि क्लिनर सूरज तेजराव सावंत (रा. यवतमाळ) यांना अटक करण्यात आली आहे. दोघांविरोधात महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम, भारतीय न्याय संहिता आणि ट्रेडमार्क अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर दारू वाहतुकीला आळा घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने सुरू केलेल्या मोहिमेतील ही मोठी कारवाई मानली जात आहे. अवैध मद्य निर्मिती, साठवणूक किंवा विक्रीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक 1800 233 3333 किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक 8657919001 वर संपर्क साधावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.