शिंदेसेनेचे नगरसेवक हॉटेलमधून बाहेर पडणार; नव्या रणनीतीने नगरसेवकांमध्ये नाराजी, काय घडलं?
मुंबई - महापालिकेतील सत्ता समीकरणात सुरू झालेल्या हॉटेल पॉलिटिक्समुळे शिंदेसेना चांगलीच चर्चेत आली. मुंबईत भाजपाला ८९ आणि शिंदेसेनेला २९ जागा जिंकता आल्या. त्यात बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपाला शिंदेसेनेची गरज भासणार आहे.
मात्र निकालाच्या दुसऱ्याच दिवशी शिंदेसेनेचे नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामाला गेले. नव्या नगरसेवकांचे शिबिर असल्याचं शिंदेसेनेकडून सांगण्यात येत होते. मात्र पडद्यामागे शिंदेसेना महापौरपदासाठी भाजपावर दबावतंत्र वापरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.
या सर्व घडामोडीची दखल केंद्रीय पातळीवर भाजपा नेतृत्वानेही घेतली आणि महापौरपदाबाबत तडजोड करणार नाही असा संदेश राज्यातील नेतृत्वाला दिला. त्यातच आता शिंदेसेनेचे नगरसेवक हॉटेलमधून बाहेर पडत आहेत. मात्र या २९ नगरसेवकांचे सर्व मूळ दस्तावेज पक्षाने त्यांच्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हॉटेलमधून हे सर्व नगरसेवक आपापल्या मतदारसंघात जाणार आहेत. पक्षाने जी कागदपत्रे विजयी नगरसेवकांकडून घेतली आहेत त्यात १६ तारखेला निकालानंतर मिळालेल्या निवडीचे प्रमाणपत्रही आहे. त्याशिवाय सर्व नगरसेवकांचे आधार कार्डही पक्षाने घेतले आहे.
१६ जानेवारीला महापालिकेचा निकाल आला त्यानंतर १७ जानेवारीपासून हे सर्व नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. मागील ३ दिवसांपासून हॉटेलमध्ये थांबलेल्या नगरसेवकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. निकालानंतर या नगरसेवकांना त्यांच्या मतदारांचे आभारही मानता आले नाहीत. त्याशिवाय आपल्या विजयाचा जल्लोषही साजरा केला नाही. फोडाफोडीच्या राजकारणात आपले नगरसेवक फुटू नयेत यासाठी एकनाथ शिंदे यांनी खबरदारी घेतली. मात्र हे नगरसेवक नेमके कोण फोडणार आहेत यावरून बरेच तर्क वितर्क राजकीय वर्तुळात सुरू होते.
पक्षाने नगरसेवकांचा गट बनवण्याच्या दृष्टीने सर्व नगरसेवकांना एकत्रित हॉटेलमध्ये ठेवण्याचे निर्देश दिले होते. महापालिका कायद्यातंर्गत गट स्थापन होण्यापूर्वी नगरसेवक पक्ष बदलू शकतात परंतु एकदा गटाची नोंदणी झाली तर पक्षांतराला आळा बसतो. त्यानंतर एक तृतीयांश नगरसेवक वेगळे झाले तरच फूट पाडणे शक्य होते. त्यामुळेच शिंदेसेनेला नगरसेवकांच्या गटाची नोंदणी लवकर करायची होती. परंतु आता पक्षाने नोंदणी प्रक्रिया टाळली आहे. शिंदेसेनेचे नेते राहुल शेवाळे दिल्लीला रवाना झालेत जिथे ते भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन विविध महापालिकेतील महापौरपदाबाबत चर्चा करणार असल्याचे बोलले जाते.
मुंबईत शिंदेसेनेकडे २९ नगरसेवक
मुंबईत शिंदेसेनेला फार मोठी कामगिरी करता आली नाही. याठिकाणी ९० जागा लढवून शिंदेसेनेला २९ जागांवर समाधान मानावे लागले. त्यात भाजपा ८९ जागा जिंकून पालिकेतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या दोन्ही पक्षाकडील मिळून ११८ चा बहुमताचा आकडा पार होत आहे. त्यात फोडाफोडी टाळता यावी यासाठी शिंदेसेनेने नगरसेवकांचे मूळ कागदपत्रे स्वत:कडे जमा केली आहेत. त्यामुळे पक्षातील नगरसेवकांमध्ये नाराजी असल्याचं सांगितले जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.