जव्हार: जव्हार तालुक्यातील तिलोंडा (आंबेपाडा) येथे रस्त्याअभावी युवकाला जीव गमवावा लागला. १८ वर्षीय शैलेश मगन वागदडा हा युवक गंभीर आजारी असताना वेळेवर उपचार न मिळाल्याने मंगळवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने
गावकऱ्यांनी शैलेशला डोली बांधून दवाखान्याकडे नेले. मात्र, तोपर्यंत उशीर
झाल्याने त्याचा प्राण वाचू शकला नाहीत. तिलोंडा (आंबेपाडा) हे आदिवासीबहुल
गाव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. पावसाळ्यात तर या गावाचा संपर्क
पूर्णतः तुटतो. रुग्णवाहिका किंवा चारचाकी वाहन गावात पोहोचू शकत नसल्याने
आजारी रुग्णांना खडतर डोंगरवाटांवरून डोलीनेच हलवावे लागते. शैलेशच्या
बाबतीतही हेच घडले. प्रकृती गंभीर असतानाही वेळेवर दवाखान्यात पोहोचणे शक्य
न झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
'गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता, आरोग्य सुविधा यासाठी मागणी करूनही ग्रामसेवक, सरपंच किंवा संबंधित विभागांकडून कोणताही ठोस पाठपुरावा झाला नाही', अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. प्रशासनाकडून केवळ आश्वासनांचीच खैरात झाली असून प्रत्यक्षात मात्र परिस्थिती 'जैसे थे' असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या घटनेने तालुक्यातील दुर्गम भागांतील आरोग्य व दळणवळण व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एका तरुणाचा बळी गेल्यानंतर तरी प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. रस्त्यासह मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात रस्ते व्हावेत यासाठी पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निधी उपलब्ध करत रस्ते व्यवस्था बळकट व्हावी म्हणून मागणी केली आहे, असे विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी म्हटले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.