Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पंतप्रधानांवर लोकसभेत हल्ला होणार होता? अघटित होऊ नये यासाठी पंतप्रधानांना रोखले, अध्यक्षांच्या माहितीने खळबळ

पंतप्रधानांवर लोकसभेत हल्ला होणार होता? अघटित होऊ नये यासाठी पंतप्रधानांना रोखले, अध्यक्षांच्या माहितीने खळबळ
 

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. बुधवारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवेदन सादर करणार होते. मात्र विरोधकांच्या गोंधळामुळे कामकाज होऊ शकले नाही आणि कामकाज स्थगित करावे लागले. सदनात झालेल्या घडामोडींसंदर्भात बोलताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. या माहितीमुळे जबरदस्त खळबळ उडाली आहे. बिर्ला यांनी म्हटले की सदनामध्ये अघटित होण्याची भीती निर्माण झाली होती, ज्यामुळे पंतप्रधानांनी सदनात येऊ नये असे आपण त्यांना सांगितल्याचे लोकसभा अध्यक्षांनी म्हटले आहे.

सौमित्र खान यांच्या आरोपामुळे सनसनाटी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसच्या महिला खासदार हल्ला करणार होत्या, असा खळबळजनक आरोप भाजप खासदार सौमित्र खान यांच्यासह इतर काही नेत्यांनी केला आहे. काँग्रेसच्या महिला खासदार हल्ला करण्याच्या उद्देशाने उजव्या बाजूने पंतप्रधानांच्या दिशेने येत होत्या, असा दावा भाजप नेत्यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय लोकसभेत प्रस्ताव मंजूर

संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार होते. मात्र, भाजप नेत्यांच्या दाव्यानुसार, हा प्रकार घडल्यामुळेच पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय लोकसभेत धन्यवाद प्रस्ताव मंजूर करण्यात आला. सौमित्र खान यांच्यासोबतच दोन केंद्रीय मंत्र्यांनीही काँग्रेसच्या महिला खासदारांविषयी गंभीर आरोप केले आहेत. बुधवारी सायंकाळी जेव्हा सर्व खासदार सभागृहात जमले होते, तेव्हा निशिकांत दुबे यांच्या भाषणादरम्यान काही खासदार त्यांच्या दिशेने चाल करून जात होते. त्याचवेळी काही महिला खासदार पंतप्रधान मोदी जिथे बसतात, तिथे गेल्या होत्या. यामध्ये वर्षा गायकवाड आघाडीवर होत्या, असा आरोप भाजपने केला आहे. 
 
निशिकांत दुबेंना झुकते माप दिले जातंय, विरोधकांचा आरोप
या आरोपांबद्दल काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, "आम्ही जबाबदार लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही देशाच्या पंतप्रधानांवर हल्ला करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही एवढे मोठे नाही की पंतप्रधानांवर हल्ला करू. केवळ महिला खासदारांना घाबरून पंतप्रधानांनी सभागृहात न येणे चुकीचे आहे," निशिकांत दुबे यांनी पंडित नेहरूंबद्दल केलेले विधान दुर्दैवी असून, विरोधकांना बोलू न देता केवळ दुबेंना संधी दिली जाते, असा आरोपही त्यांनी केला.
पंतप्रधान लोकसभा अध्यक्षांच्या मागे लपतायत! प्रियंकांचा आरोप

काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी म्हटले की, "हे धादांत खोटं आहे, पंतप्रधानांवर हात उचलण्याचा साधा विचारही कोणी करू शकत नाही. त्यामुळे असं म्हणणं की काहीतरी कट रचला जात होता, तर ते साफ खोटं आहे. मला हे बोलताना खेद वाटतोय मात्र पंतप्रधान लोकसभा अध्यक्षांच्या मागे लपतायत. काल पंतप्रधानांमध्ये सदनात येण्याचे धारिष्ट्य नव्हते. तीन महिला खासदार त्यांच्या आसनासमोर उभ्या होत्या म्हणून ?"

जे घडतंय ते वेदनादायी आहे, भाजपची प्रतिक्रिया
सदनाच्या इतिहासात या अबोध बालकाचे नाव काळ्या अक्षरात लिहिले जाईल असे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटले. भाजपच्याच रवी शंकर प्रसाद यांनी म्हटले की, "लोकसभा अध्यक्षांनी एकप्रकारे आपल्या वेदना मांडल्या आहेत. संसदेच्या इतिहासात आजपर्यंत पंतप्रधानांना जबरदस्ती बोलण्यापासून रोखण्याचा, घेराव करण्याचा प्रयत्न केला गेला आणि अध्यक्षांना पंतप्रधानांना सांगावे लागले की सदनात येऊ नये. संसदेत कायद्याच्या चौकटीत राहून वाद-प्रतिवाद होणं अपेक्षित असतं, मात्र इथे जबरदस्ती सुरू आहे. हा आहे राहुल गांधींच्या काँग्रेसचा खरा चेहरा. "


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.