मुंबई : महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना 'झेड प्लस' दर्जाची सुरक्षा मिळणार आहे. याविषयीचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला. याआधी खासदार असताना पवार यांना 'एक्स' दर्जाची सुरक्षा होती. मात्र, उपमुख्यमंत्रिपदी शपथ घेतल्यानंतर पवार यांच्या सुरक्षेची विशेष खबरदारी राज्य सरकारकडून घेण्यात येत आहे.
सुनेत्रा पवार यांना मोठ्या जबाबदाऱ्या
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांना शनिवार, ३१ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्रिपदी शपथ देण्यात आली. पवार यांच्याकडे तीन खातीही सोपविण्यात आली असून, मंत्रालयात अजित पवार यांच्या वापरातील दालनेही त्यांच्या कार्यालयासाठी मंगळवारी प्रदान करण्यात आली. पुणे आणि बीड हे राज्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या जिल्ह्यांचे पालकमंत्रिपदही त्यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेचा आढावा राज्य सरकारकडून घेण्यात आला असून, त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सुनेत्रा पवार यांना यापुढे 'झेड प्लस' दर्जाची सुरक्षा मिळणार असून, त्याविषयीच्या सूचना गृह विभागाला देण्यात आल्या आहेत. सुनेत्रा पवार या आठवड्याच्या अखेरीस किंवा पुढील आठवड्यात पदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याचे समजते. X,Y,Z आणि Z+ अशा सरकारकडून देण्यात येणाऱ्या सुरक्षेच्या विविध श्रेणी आहेत. सुरक्षा यंत्रणा वेळोवेळी आढावा घेऊन सुरक्षा व्यवस्थेचा दर्जा ठरवतात. देशभरातील अतिमहत्त्वाच्या पदावरील व्यक्ती, तसेच कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर असलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींना सरकारकडून सुरक्षा पुरवली जाते.
झेड प्लस सुरक्षा म्हणजे काय?
झेड
प्लस सुरक्षा ही SPG नंतर भारतातील दुसरी सर्वोच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था
आहे. ती प्रामुख्याने व्हीव्हीआयपी, केंद्रीय मंत्री,
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री किंवा अत्यंत धोका असलेल्या व्यक्तींना दिली
जाते.
झेड प्लस सुरक्षेत कशाचा अंतर्भाव?
झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत एक बूलेटप्रूफ गाडी, 2 एस्कॉर्ट गाड्या, अधिकारी आणि 8 जवान मिळून 30 पेक्षा जास्त सुरक्षा कर्मचारी तैनात असतात. या व्यक्ती एखाद्या कार्यक्रमाला जाणार असतील, तर आधीच त्या ठिकाणच्या सुरक्षेची तपासणी केली जाते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.