सांगली : सांगली पोलिस दलातील 59 रिक्त पदांसाठी तीन दिवस पोलिस भरती घेण्यात आली. यावेळी झालेल्या शारीरिक चाचणीमध्ये 2 हजार 326 पुरुष आणि स्त्री उमेदवारांनी आपली शारीरिक चाचणी दिली. यापैकी 2 हजार 140 पुरुष आणि स्त्री
उमेदवार शारीरिक चाचणीत पात्र ठरले आहेत. सांगली पोलिस दलात 59 रिक्त
जागांसाठी डिसेंबर 2025 मध्ये भरती जाहीर करण्यात आली होती. यासाठी एकूण 3
हजार 171 अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले होते. ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांना
कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. दि. 11 ते
13 असे तीन दिवस पोलिस क्रीडांगणावर शारीरिक चाचणी पार पडली.
747 महिला उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. यापैकी 604 महिला उमेदवार कागदपत्र पडताळणी व शारीरिक चाचणीसाठी उपस्थित होत्या. यापैकी 542 महिला उमेदवार पात्र ठरल्या आहेत. तसेच 2 हजार 424 पुरुष उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, यापैकी 1 हजार 722 पुरुष उमेदवार हे कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक चाचणीसाठी उपस्थित होते. यापैकी 1 हजार 598 पुरुष उमेदवार पात्र ठरले आहेत. या उमेदवारांची यादी सांगली पोलिसांच्या संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहे. यामध्ये कोणाला हरकत असल्यास त्यांना दि. 16 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत हरकत घेता येणार आहे. भरती प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात आले आहे. भरती प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.