पुणे: पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौड पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्यावर लाच घेतल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. तक्रारदाराकडून तपासात मदत करण्याच्या मोबदल्यात पैशांची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. पडताळणीनंतर सापळा रचून संबंधित अधिकाऱ्याला प्रत्यक्ष रक्कम स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पौड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन बाळासाहेब शिंदे (वय 45) यांना 35,000 रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. ही कारवाई 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 17.40 वाजता मुळशी बीट कार्यालयात करण्यात आली. तक्रारदाराविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास सचिन शिंदे करत होते. संबंधित गुन्ह्यात तक्रारदाराची गाडी जप्त न करण्यासाठी आणि तपासात मदत करण्यासाठी त्यांनी 1,00,000 रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार 18 फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.20 फेब्रुवारी रोजी पडताळणी करण्यात आली असता शिंदे यांनी 1,00,000 रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. तडजोडीनंतर ही रक्कम 35,000 रुपयांवर निश्चित करण्यात आली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. पंचांच्या उपस्थितीत तक्रारदाराकडून 35,000 रुपये स्वीकारताना शिंदे यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी काम पाहिले, तर तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे काम पाहत आहेत. पौड परिसरात या कारवाईमुळे खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराविरोधात प्रशासनाने कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.