Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :-विश्रामबाग चौकाजवळील अनधिकृत 68 खोकी जमीनदोस्त:,आयुक्त ना बधले, ना हटले

सांगली :- विश्रामबाग चौकाजवळील अनधिकृत 68 खोकी जमीनदोस्त:,आयुक्त ना बधले, ना हटले
 

सांगली : येथील विश्रामबाग चौक ते आलदर चौकापर्यंतची अनधिकृत 68 खोकी सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या कारवाईत जमीनदोस्त झाली. अतिक्रमण, अनधिकृत खोकी हटवताना खोकीधारकांनी जोरदार विरोध केला. वादावादीचेही प्रकार घडले. आयुक्त सत्यम गांधी यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्नही झाला. त्यानंतर प्रशासनाने जादा पोलिस फौजफाटा मागवून कारवाईचा वेग वाढवला आणि विनापरवाना खोक्यांचा सुपडासाफ केला.

मिरज-सांगली रस्त्यावर विश्रामबागजवळ दांडेकर मार्टसमोर रेल्वेचा जुना मार्ग आहे. हा सर्व भाग खोक्यांनी व्यापला होता. येथे विनापरवाना 68 खोकी होती. झेरॉक्स सेंटर, मोबाईल साहित्य विक्री दुकान, मटण शॉप, चहाचे स्टॉल, गॅरेज, सायकल दुरुस्तीचे खोके, पान शॉप, पार्लर, फुले विक्री केंद्र, लाँड्री, चिकन सेंटर, टायर दुकान आदीसह अनेक प्रकारच्या व्यवसायांचे शेड, खोकी होती. वर्षभरापूर्वी रेल्वे प्रशासनाने महापालिकेकडे अर्ज देऊन या जागेवरील खोकी, दुकानांची अतिक्रमणे हटविण्याची मागणी केली होती. दरम्यान, याठिकाणी अवैध व्यवसाय, नशेखोरीचे प्रकार चालतात, अशाही तक्रारी काही नागरिकांनी महापालिकेच्या नागरी संवाद उपक्रमात केल्या होत्या. याची गंभीर दखल आयुक्त सत्यम गांधी यांनी घेतली आणि विनापरवाना खोक्यांवर कारवाई केली. 
 
सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता कारवाई सुरू झाली. खोकीधारकांनी कारवाईस विरोध केला, मात्र हा विरोध डावलून प्रशासनाने कारवाई सुरूच ठेवली. याठिकाणी तत्कालीन रेल्वे स्थानकाची छोटी कौलारू दगडी इमारत होती. ही जुनी इमारत जीर्ण झाली होती. तीही पाडण्यात आली. काहींनी ही इमारत का पाडली, असा सवाल केला. त्यावर, या इमारतीत अवैध धंदे सुरू होते, नशाबाजी होत होती, अशा तक्रारी असल्याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. विनापरवाना खोक्यांवर कारवाईवेळी खोकीधारकांचा जोरदार विरोध झाला. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

आयुक्त ना बधले, ना हटले
विनापरवाना खोक्यांवर कारवाई सुरू असताना आयुक्त सत्यम गांधी उपस्थित होते. कारवाईची पाहणी करत होते. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त अश्विनी पाटील, नगररचना विभागाचे सहायक संचालक हणमंत मारनूर, अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख तथा सहायक आयुक्त नागार्जुन मद्रासी, सहायक आयुक्त सचिन सागावकर उपस्थित होते. दरम्यान, दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कारवाईवेळी प्रचंड तणाव निर्माण झाला. काहींनी आयुक्त गांधी यांच्याशी वाद घातला. त्यांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना रोखले. या सर्व परिस्थितीतही आयुक्त गांधी बधले नाहीत आणि जागेवरून हटलेही नाहीत. ते शांतपणे कारवाईची भूमिका स्पष्ट करत होते. शिवाय या प्रकारानंतर त्यांनी जादा फौजफाटा मागवून घेतला आणि विनापरवाना खोक्यांचा सुपडासाफ केला. दुपारी दोन वाजल्यानंतर कारवाईला विशेष गती आली होती. जेसीबीच्या साहाय्याने खोक्यांचा चक्काचूर सुरू होता आणि हवेत धुरळा उडत होता.
खोक्यांवर, जेसीबीवर चढून केला विरोध

विनापरवाना खोक्यांवर जेसीबीच्या साहाय्याने कारवाई सुरू असताना, काही खोकीधारकांनी खोक्यांवर आणि जेसीबीवर चढून कारवाईला विरोध केला. जेसीबीची चावी काढून घेतली. कारवाईवेळी अडथळा आणला. यावेळी पोलिस आणि काही खोकीधारकांमध्ये झटापट झाली. दरम्यान, एका खोक्यावर जेसीबीचा फटका बसणार, तोच काहीजण खोक्यात जाऊन उभे राहिले व कारवाईला विरोध करू लागले. त्यावेळी पथकाने थोडे सबुरीचे धोरण अवलंबले; पण लगेचच पुन्हा कारवाईला सुरुवात केली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.