'सहा लाख दे.. गुन्ह्यात आरोपी करत नाही'; लाच घेताना सहाय्यक पोलिस निरीक्षक जाळ्यात, मिरजेत ACB ची कारवाई
मिरज : मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी न करण्याच्या मोबदल्यात सहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक पोलिस निरीक्षकास पकडण्यात आले. सुनील गुरव असे संशयित पोलिस अधिकाऱ्याचे नाव असून तो मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस ठाण्यासमोर असलेल्या एका हॉटेलजवळ आज रात्री ही कारवाई केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली माहिती अशी, संशयित सहाय्यक निरीक्षक सुनील गुरव यांच्याकडे मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मालगाव परिसराचा कार्यभार आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांत दाखल झालेल्या गुन्ह्यात तक्रारदारास आरोपी न करण्यासाठी गुरव यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराला ही रक्कम द्यायची नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर काल रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पोलिस ठाण्यासमोर असलेल्या एका हॉटेलमध्ये तक्रारदाराकडून सहा लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने सुनील गुरव यास रांगेहाथ पकडले. याबाबत मिरज शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्र िक्रया सुरू होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.