Big Breaking! मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु असतानाच सहकुटुंब घेऊन 21 आमदार ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड दौऱ्यावर; काँग्रेसमध्ये खळबळ!
बंगळूर : कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या नेतृत्व बदलाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर सुमारे २१ काँग्रेस आमदार कुटुंबासह ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत.
मंगळवारी (ता. १७) रात्री बंगळूरच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिला गट निघाला, तर उर्वरित आमदार आज रवाना होणार असल्याची माहिती आहे. हा दौरा सुमारे १३ दिवसांचा असून, तीन मार्चपर्यंत ते बंगळुरात परतणार आहेत. नेतृत्व बदलाच्या चर्चांना वेग आला असतानाच हा दौरा ठरल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. सुरुवातीला हा दौरा पशुसंवर्धन व कृषी क्षेत्रातील अभ्यासासाठी असल्याची चर्चा होती. मात्र, त्याला विरोध झाल्यानंतर काही आमदारांनी हा वैयक्तिक दौरा असल्याचे स्पष्ट केले.
या पहिल्या गटात आमदार पुट्टरंगशेट्टी, एच. डी. तिम्मय्या, हम्पनगौडा बादरली, देवेन्द्रप्पा, बी. एम. नागराज तसेच विधान परिषद सदस्य वसंत कुमार यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील नेतृत्व बदलाच्या शक्यतेवरून अंतर्गत हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. दिल्ली भेटीदरम्यान शिवकुमार यांनी पक्षाच्या हायकमांडशी चर्चा केल्याचे बोलले जात आहे.करारानुसार नेतृत्व बदल करावा, अशी मागणी काही आमदारांनी केल्याच्या बातम्या आहेत. मात्र, आमदारांनी या सर्व राजकीय चर्चांना फेटाळून लावले आहे. जागरलूरचे आमदार देवेन्द्रप्पा यांनी सांगितले की, सुमारे २१ आमदार वैयक्तिक खर्चाने परदेश दौऱ्यावर जात आहोत. कोणत्याही राजकीय कारणासाठी हा दौरा नाही. दोन महिन्यांपूर्वीच आम्ही हा कार्यक्रम ठरवला होता. आमच्या दौऱ्याला कोणीही प्रायोजित केलेले नाही. आम्ही सर्व काँग्रेसचेच आहोत.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमच्यासाठी दोन्ही डोळ्यांसारखे आहेत. पशुसंवर्धन मंत्री के. वेंकटेश यांनीच हा दौरा आयोजित केल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की, माझ्या विभागाकडून कोणताही दौरा आयोजित केलेला नाही. मी स्वतःही परदेश दौऱ्यावर जात नाही. अर्थसंकल्पामुळे मी येथेच आहे. दरम्यान, मंत्री भैरती सुरेश यांनी हा दौरा आयोजित केल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. शिवकुमार म्हणाले की, या दौऱ्याबाबत माध्यमांतूनच माहिती मिळाली आहे. हा त्यांचा वैयक्तिक दौरा आहे की, कोणीतरी प्रायोजित केला आहे, याची मला माहिती नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.