Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! शिवनेरीवर शिवजयंतीला गालबोट; अलोट गर्दीमुळे चेंगराचेंगरी, महिला-मुलांसह अनेक शिवभक्त जखमी

Big Breaking! शिवनेरीवर शिवजयंतीला गालबोट; अलोट गर्दीमुळे चेंगराचेंगरी, महिला-मुलांसह अनेक शिवभक्त जखमी
 

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर येथील ऐतिहासिक शिवनेरी गडावर शिवजयंतीच्या उत्सवात मोठी दुर्घटना घडली. शिवजन्मोत्सवाचा सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो शिवभक्त गडावर दाखल झाले होते, पण वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात प्रशासनाला अपयश आल्याने अंबरखाण्याच्या परिसरात मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत महिला आणि लहान मुलांसह अनेक नागरिक जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शिवनेरी गडावर नेमकं काय घडलं?

शिवजयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवनेरीवर शिवज्योत घेऊन येणारे तरुण, विविध संघटनांचे कार्यकर्ते तसेच शिवजन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी उसळली होती. मध्यरात्रीपासूनच गडाच्या रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. पण वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्याने परिस्थिती काही काळ तणावपूर्ण झाली. अंबरखाण्याच्या खालील हत्ती दरवाजा आणि गणेश दरवाजा यासारख्या अरुंद मार्गांवर एकाच वेळी मोठ्या संख्येने शिवभक्त जमल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली.

नियोजन कोलमडले, पोलीस बंदोबस्त अपुरा
या घटनेत काही महिला आणि लहान मुलांसह अनेक नागरिक किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळालीय. जखमींना तातडीने जुन्नर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पण या घटनेमुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शिवजयंतीसारख्या मोठ्या उत्सवावेळी दरवर्षी मोठी गर्दी होत असल्याने भविष्यात योग्य गर्दी नियंत्रण, प्रवेश-निर्गमन मार्गांचे नियोजन आणि पुरेसा पोलीस बंदोबस्त हा आदल्या दिवसापासूनच गडावर ठेवणे गरजेचे आहे. शिवजयंती हा राज्याचा मोठा सण असूनही, दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने खबरदारी का घेतली नाही? असा संतप्त सवाल आता शिवभक्तांकडून विचारला जात आहे. पुढील काळात अशा दुर्घटना टाळण्यासाठी गडावर कायमस्वरूपी गर्दी व्यवस्थापन यंत्रणा राबवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.