Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! राज्यातील 'या' जिल्ह्यात दूध भेसळीचे मोठं रॅकेट; रसायन टाकून दूध दुप्पट करण्याचं जाणून घ्या प्रकरण

Big Breaking! राज्यातील 'या' जिल्ह्यात दूध भेसळीचे मोठं रॅकेट; रसायन टाकून दूध दुप्पट करण्याचं जाणून घ्या प्रकरण
 

अहिल्यानगर मशीनच्या सहाय्याने कृत्रिम दूध तयार करून त्याची जिल्हाभर विक्री करणारी मोठी साखळी पोलिसांच्या हाती लागली आहे. दूध भेसळ प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी ३१ आरोपींना अटक केली आहे. अनेक दूध संकलन केंद्रे पोलिसांच्या रडारवर आहेत. त्याचा परिणामी जिल्ह्यातील दूध संकलनावर होताना दिसत आहे. 
 
जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथील कारवाईतून हा प्रकार समोर आला होता. दूध संकलन केंद्रावर कृत्रिम दुधाचे मोठे कॅन पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी दूध संकलन केंद्र चालक रामदास नवनाथ उबाळे, रसायन पुरविणारे समीर कमरुद्दीन शेख (रा. उंबरे, ता. राहुरी), आफताब कलीम शेख (रा. शुक्लेश्वर चौक, राहुरी) अशा तिघांना अटक केली. 

यातील समीर शेख व अफताब शेख हे दोघे प्रमुख आरोपी आहेत. ते कृत्रिम दूध तयार करून विक्रीचे रॅकेट चालवितात. त्यांचे राहुरी तालुक्यात कृत्रिम दूध तयार करणारे केंद्र आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी केंद्राचा शोध घेतला. पोलिस केंद्रापर्यंत पोहोचले. परंतु, तेथील मशिनरीच गायब होती. मशिनरी गायब केल्याने शेख याच्या कुटुंबातील इतरांनाही आरोपी करण्यात आले आहे. मशिनरी न मिळाल्याने हे दूध जिल्ह्यात कुठे कुठे जात होते, मुख्य आरोपी समीर शेख याच्या जिल्ह्यातील कोण कोण संपर्कात होते, याचा पोलिसांनी शोध घेतला.
 
दूध संकलन केंद्र चालविणाऱ्या २९ जणांना पोलिसांनी आरोपी केले आहे. त्यामुळे प्रकरणातील आरोपींची संख्या आता ३१ वर पोहोचली असून, ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात दूध भेसळ प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतून दूध संकलन होते. रसायन टाकून दूध दुप्पट केले जात असल्याचे पोलिस कारवाईतून समोर आले आहे. दूध व दुधापासून तयार केलेल्या पदार्थाची मोठ्या प्रमाणत विक्री होते. दुधापासून, दही, ताक, पनीर व इतर पदार्थ बनविले जातात. दुधात भेसळ असल्याने तयार होणारे पदार्थ मानवी आरोग्यास धोकादायक आहेत. दुधात भेसळ हा प्रकार गंभीर असून, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी जिल्ह्यात पुढे येत आहे.

श्रीगोंद्यात सापडले होते दूध भेसळीचे रॅकेट
 
◼️ श्रीगोंदा तालुक्यात एका दूध संकलन केंद्रावर बनावट दूध तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन मिळून आले होते.
◼️ या प्रकरणी पोलिसांनी १५ जणांना अटक केली होती. ही कारवाई २०२३ मध्ये झाली. त्यानंतरची जामखेड तालुक्यातील ही दुसरी कारवाई आहे.
◼️ बनावट दूध विक्री करणारी साखळी पोलिसांच्या हाती लागली आहे. यात अनेक बड्या संकलन केंद्र चालकांचे हात गुंतलेले आहेत. पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग तपास करत आहेत.

दररोज ४६ लाख लीटर दुधाचे संकलन
◼️ जिल्ह्यात दररोज ४६ लाख लीटर दुधाचे संकलन केले जाते. गावोगावी दूध संकलित करून ते वाहनातून शीत केंद्रावर पोहोच केले जाते.
◼️ प्रवासादरम्यान १०० लीटरचे दूध दीडशेवर जाते, अशा चर्चा दबक्या आवाजात असतात. परंतु, तक्रार करण्याचे कुणी धाडस करत नाही. त्यामुळे दूध संकलन केंद्र चालकांचे धाडस वाढते.

जामखेड येथील दूध भेसळ प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, या प्रकरणी आतापर्यंत ३१ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी बनावट दूध आणखी कुणाला विकत होते, याची चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. - किरणकुमार कबाडी, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.