Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! उत्तर प्रदेशहून पहाटे ट्रेन मुंबईत पोहचली, ४ वाजता पोलिसांनी जनरल डब्ब्यात धाड टाकली, बॅग पाहून सगळेच चक्रावले

Big Breaking! उत्तर प्रदेशहून पहाटे ट्रेन मुंबईत पोहचली, ४ वाजता पोलिसांनी जनरल डब्ब्यात धाड टाकली, बॅग पाहून सगळेच चक्रावले
 
 
गोरखपूर-मुंबई अवध एक्सप्रेसमधून आणण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील चरसचा साठा वांद्रे रेल्वे टर्मिनस येथे रेल्वे पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत तब्बल 13 कोटी 83 लाख 40 हजार रुपये किंमतीचा चरस हस्तगत करण्यात आला असून, चालू वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. 
 
शनिवारी सकाळी सुमारे सव्वाचार वाजता गोरखपूरहून मुंबईत दाखल झालेल्या गाडीची नियमित तपासणी सुरू असताना जनरल डब्यात एक संशयित बॅग आढळली. रेल्वे पोलिसांनी तात्काळ बॅगेबाबत चौकशी सुरू केली. बॅग संशयास्पद वाटल्याने रेल्वे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रेल्वे पोलीस फोर्स, फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाच्या उपस्थितीत पंचनामा करून बॅग ताब्यात घेण्यात आली.

 
तपासणीत त्या बॅगेत 31 पॅकेट्स आढळली. प्रत्येक पॅकेटमध्ये उच्च प्रतीचा चरस भरलेला होता. एकूण वजन 13 किलो 834 ग्रॅम इतके असून, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 13 कोटी 83 लाख 40 हजार रुपये इतकी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्राथमिक तपासात हा अमली पदार्थ गोरखपूर येथून मुंबईत विक्रीसाठी आणण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, बॅग घेण्यासाठी कोणीही स्टेशनवर आले नसल्याने किंवा पोलिसांची हालचाल लक्षात घेऊन अज्ञात व्यक्तीने ती जनरल डब्यात सोडून पलायन केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
या प्रकरणी वांद्रे रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तपास करत आहेत. दरम्यान, हा चरस आंतरराज्य पातळीवरील टोळीमार्फत मुंबईत पाठवण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज असून, या रॅकेटमागील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. रेल्वे मार्गाचा वापर करून अमली पदार्थांची तस्करी करण्याच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी अधिक सतर्कता बाळगण्याचा इशाराही दिला आहे. 



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.