'स्वत:ला कधीही कमी लेखू नका, आपल्या प्रत्येकामध्ये अमर्याद क्षमता असते,' ही प्रतिक्रिया आहे तान्या नाथन यांची. त्यांना हे बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे, कारण त्यांनी आपल्यातील क्षमता सिध्द केली. तान्या नाथन यांनी वयाच्या २४ व्या वर्षी देशातील पहिल्या अंध महिला न्यायाधीश बनून इतिहास रचला आहे. जन्मापासूनच १०० टक्के अंधत्व आलेलया तान्या यांची ही कामगिरी ऐतिहासिक तर आहेच, पण न्यायव्यवस्थेत दिव्यांगांना संधीची द्वारे खुली करून देणारी आहे.
तान्या मूळच्या केरळच्या आहे. वकील झाल्यानंतर न्यायाधीश होण्यासाठी परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा अवघड असते. पण आपल्या स्वप्नांना कोणत्याही सीमांमध्ये अडकवणे तान्या यांना मंजूरच नव्हतं. त्यामुळे प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी ही परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात त्या यशस्वीही झाल्या. या परीक्षेसाठी सगळा अभ्यास ब्रेलमध्ये उपलब्ध नव्हता. पण तान्या यांनी ब्रेलमध्ये नोट्स तयार केल्या. वकील झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच वकिलीची प्रॅक्टीस करता करताच त्यांनी न्यायाधीश पदासाठीच्या या परीक्षेची तयारी केली हे विशेष. प्रचंड मेहनत आणि ध्येयाप्रती निष्ठा असली की काय घडतं हे तान्या यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते.
केरळ न्यायिक सेवा, २०२०५ च्या सिव्हील जजेस (ज्युनियर डिव्हिजन)च्या परीक्षेत दिव्यांग विभागात तान्या पहिल्या आल्या. २०२४ च्या ऑगस्ट महिन्यात तान्या यांनी वकिलीच्या प्रॅक्टीसला सुरूवात केली. त्यावेळी त्यांनी या परीक्षेबद्दल ऐकलं होतं. ती देऊन बघावी असंही त्यांना वाटलं. पण दिव्यांगांना या परीक्षेला बसण्याची तेव्हा परवानगी नव्हती. 'एखाद्या गोष्टीसाठी आपली पात्रता आहे की नाही हे बघण्यासाठी परीक्षा असते. पण व्यवस्थेनंच ती संधी नाकारली असेल तर काय करायचं?' असा सवाल तान्या यांना पडला होता. पण न्यायव्यवस्थाच त्यांच्या पाठिशी उभी राहिली.२०२५ मध्ये सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. 'न्यायव्यवस्थेतील सेवेसाठी दृष्टीहीन किंवा दृश्टीने दिव्यांग असलेल्या व्यक्तींना 'पात्र नाही' असे म्हणून संधी नाकारता येणार नाही. न्याय व्यवस्थेतील पदांसाठीच्या निवडीच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अशा व्यक्तीही पात्र आहेत,' या निर्णयामुळे तान्या यांच्यासारख्या अंध, पण हुशार असलेल्यांसाठी पुढे संधीचे दरवाजे खुले झाले. हा निर्णय त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. 'न्यायव्यवस्थेत पद मिळवण्याच्या संधींबाबत अशा व्यक्तींना कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला सामोरे जावे लागू नये. उलट राज्याने याबाबत सर्वसमावेशक चौकट तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत,' असेही या खंडपीठाने म्हटले होते. 'केवळ दृष्टीहीन असल्यामुळे कोणत्याही व्यक्तीला संधी नाकारली जाऊ नये,'असे या खंडपीठाच्या निर्णयात स्पष्ट म्हटले होते. तान्या यांनी या संधीचे सुवर्णसंधीत रुपांतर केले आणि त्यांचे स्वप्न पूर्ण केले.तान्या यांनी कन्नूर विद्यापीठातून एलएलबीची पदवी प्रथम श्रेणीत घेतली. कायद्याचा अभ्यास करतानाच त्यांनी ब्रेल लिपीचाही सखोल अभ्यास केला. स्क्रीन-रीडिंग सॉफ्टवेअर्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर आणि योग्य वापर केला. वकिलीची पदवी घेतल्यानंतर तान्या यांनी कन्नूरच्याच तालीपरंबामध्ये ज्येष्ठ वकील के.जी. सुनीलकुमार यांच्याकडे ज्युनिअर वकील म्हणून प्रॅक्टीस सुरू केली. प्रॅक्टीस करताना त्या त्यांचे महत्त्वाचे मुद्दे, नोट्स ब्रेल लिपीमध्ये स्वत: तयार करत. प्रचंड कष्ट घेण्याची तयारी आणि शिस्त हे त्यांच्या स्वभावातच असल्याने त्याचा त्यांना फायदा झाला. अर्थातच यामध्ये त्यांना भरपूर अडथळे आले, पण प्रत्येकवेळेस त्यावर मात केली. आताही भविष्यात त्यांच्यापुढची आव्हाने सोपी नाहीत हे माहिती आहे. विशेषत: जुने दस्ताऐवज वाचण्यात समस्या येऊ शकतात असे त्यांना वाटते. पण प्रगत तंत्रज्ञान आणि अनुभव तसेच व्यवस्थेतील बदलामुळे त्या या आव्हानांनाही सामोरे जातील असा त्यांना विश्वास आहे.
धडधाकट
असूनही माणसं रडत बसतात, संधी मिळूनही तक्रारी करत राहतात. पण तान्या
यांनी अंधत्वासारख्या शारीरिक मर्यादेलाच आपली शक्ती बनवलं. दृढनिश्चय,
ध्येय आणि योग्य संधी मिळाली तर कोणतीही समस्या तुमचा मार्ग रोखू शकत नाही,
हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांचं हे यश तिच्या एकटीपुरतंच मर्यादित नाही.
त्यांच्यासारख्या ध्येयवेड्या, पण संधीच्या शोधात असलेल्या असंख्य
दिव्यांगांना यामुळे नक्कीच प्रेरणा मिळणार आहे. न्यायव्यवस्थेसारख्या
मोठ्या क्षेत्राची दालनेही दिव्यांगांसाठी उघडली जातील हेही तितकेच
महत्त्वाचे!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.