नागपूर : नागपुरात महापौरपदासाठी ६ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. महापौरपदासाठी ज्येष्ठ नगरसेविका नीता ठाकरे यांच्या नावावर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एकमत झाल्याचे सूत्राने नमुद केले. मात्र महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वीच भाजपच्या निवडून आलेल्या सर्व १०२ नगरसेवकांनी राजीनामे दिले. सर्व नगरसेवकांनी गटनेते बाल्या बोरकर यांच्या सूचनेनुसार राजीनामे दिले.
महापालिकेतील सत्तापक्ष नेतेपदी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक बाल्या उपाख्य नरेंद्र बोरकर यांची शनिवारी नियुक्ती करण्यात आली. महाल येथील रजवाडा पॅलेसमध्ये पार पडलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत शहर भाजपाध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी याबाबत घोषणा केली. ज्येष्ठ नगरसेवकांसह काही तरुण नवे चेहरेही निवडून आले आहे. महापालिकेच्या कामाची त्यांना माहिती व्हावी, यासाठी प्रशिक्षण वर्ग घेण्यात येईल, असे बाल्या बोरकर यांनी नियुक्तीनंतर सांगितले. याशिवाय त्यांनी सर्व १०२ नगरसेवकांचे राजीनामे घेतल्याचे सांगितले. गतवेळीप्रमाणे भाजपने सर्व १०२ नगरसेवकांकडून राजीनामापत्र लिहून घेतले आहे. पक्ष विरोधी कारवाई किंवा इतर अनुचित प्रकारात कुणी आढळून आल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यासाठी हे राजीनामे घेण्यात आल्याची माहिती आहे.गटनेते बोरकर यांच्या सूचनेनुसार नगरसेवकांनी राजीनामे लिहून दिले आहेत. हा पक्षाअंतर्गत आचारसंहितेचा एक भाग असल्याचे बोरकर यांनी स्पष्ट केले. शहरातील नागरिकांनी दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वानुमते सत्तापक्ष नेते म्हणून बाल्या बोरकर यांच्या नावाला पसंती देण्यात आली. बाल्या बोरकर यांच्यावर यापूर्वी भाजपने महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष, परिवहन समिती सभापती व पक्षाचे उपनेते म्हणून जबाबदारी दिली होती. त्यांनी ती यशस्वीरित्या पार पाडली. बाल्या बोरकर पूर्व नागपुरातील प्रभाग क्रमांक २३ मध्ये सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून आले. त्यांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत माजी महापौर नरेश गावंडे यांचा पराभव केला होता. महापालिका सभेचे संचालन, कामाचा अनुभव आणि नगरसेवकांसोबत समन्वयाची भूमिका या आधारावर बाल्या बोरकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे शहर भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.
निता ठाकरे नागपूरच्या आठव्या महिला महापौर?
राज्याची
उपराजधानी नागपूरच्या आठव्या महिला महापौर म्हणून निता ठाकरे यांची
भाजपच्या संसदीय मंडळाने निवड केल्याचे सुत्राने नमुद केले. शुक्रवारी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यात
झालेल्या बैठकीत आमदार मोहन मते यांनी दक्षिण नागपूरला महापौरपद मिळावे,
यासाठी आग्रह धरला होता. बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापौरांचे
नाव गुलदस्त्यात ठेवले. त्यामुळे दक्षिण नागपुरातील निता ठाकरे की दिव्या
धुरडे असा प्रश्न सर्वांना पडला होता.
शुक्रवारी
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
बैठकीनंतर आज, शनिवारी नगरसेवकांची बैठक महाल येथील रजवाडा पॅलेसमध्ये पार
पडली. या बैठकीत महापौर म्हणून निता ठाकरे यांच्याच नाव अंतिम झाल्याचे
सूत्राने सांगितले. एवढेच नव्हे तर उपमहापौरपदी अॅड. संजय बालपांडे तर
स्थायी समिती अध्यक्ष म्हणून शिवानी दाणी यांना जबाबदारी देण्यात येणार
असल्यची पुस्तीही सुत्राने जोडली. आज रविवारी सायंकाळी शहर भाजप अध्यक्ष
दयाशंकर तिवारी यांनी पत्रकारपरिषदेचे आयोजन केले असून यात महापौर,
उपमहापौरांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
पहिल्या महापौरांच्या पुण्यतिथीदिनी ठरले ५५ वे महापौर
शुक्रवारी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीतच महापौरांचे नाव ठरल्याचे सुत्राने नमुद केले. विशेष म्हणजे काल, शुक्रवारी नागपूर नगरीचे प्रथम महापौर बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांची पुण्यतिथी होती. नेमके याच दिवशी शहराचा ५५ व्या महापौरांचे नाव निश्चित झाले. त्यांच्या कन्या कुंदा विजयकर यांना नागपूर नगरीच्या पहिल्या महिला महापौर होण्याचा मान मिळाला होता. त्यानंतर कल्पना पांडे, वसुंधरा मासुरकर, पुष्पा घोडे, माया इवनाते, अर्चना डेहनकर, नंदा जिचकार या ७ महिला महापौरांनी आपल्या कार्याची छाप पाडली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.