महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही वर्षात चांगल्याच उलथापालथी आणि त्यातून काही नवीन समीकरणं जुळत असल्याचे दिसत आहे. भिवंडी महापौरपदाच्या निवडणुकीत मोठा उलटफेर झाला आहे. कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक पार पडली.
जवळपास महिनाभर आघाडी-युतीची आकडेमोड सुरू होती. त्यातून काही नवीन समीकरणं जुळून आल्यानंतर आज मोठी घडामोड झाली. धर्मनिरपेक्ष आघाडीचे नारायण चौधरी हे भिवंडी-निजामपूर महापालिकेचे महापौर झाले आहेत. महापौर पदाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेवकांनी वेळ वाढवण्याची मागणी केली. वाहतूक कोंडी असल्याने महापौर पदाचे कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांना सभागृहात यायला उशीर झाला. मात्र, पीठासीन अधिकाऱ्यांनी वेळ वाढवण्याची मागणी फेटाळून लावली. त्यानंतर एकूण १० पैकी ७ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. नारायण चौधरी, स्नेहा पाटील आणि विलास पाटील हे रिंगणात राहिले. काँग्रेसच्या नेतृत्वातील धर्मनिरपेक्ष आघाडीचे उमेदवार नारायण चौधरी यांना ४८ मते पडली. यामध्ये काँग्रेसची ३०, भाजप फुटीरांची ६ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची १२ मते मिळाली. तर, कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांना २५ मते मिळाली. भाजपच्या स्नेहा पाटील १६ मते मिळाली. महापौरपदाच्या निवडणुकीच्या मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. भाजप, काँग्रेसने व्हीप बजावला होता. व्हीप मोडणाऱ्या नगरसेवकांवर भाजप काय कारवाई करणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.