Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता घरही असुरक्षित, सांगलीकर धास्तावले; विश्रामबागेत चोरट्यांचा धुमाकूळ ; कायदा-सुव्यवस्था, नागरी सुरक्षेच्या चिंधड्या

आता घरही असुरक्षित, सांगलीकर धास्तावले; विश्रामबागेत चोरट्यांचा धुमाकूळ ; कायदा-सुव्यवस्था, नागरी सुरक्षेच्या चिंधड्या
 

सांगली : गळ्यात सोन्याचे दागिने घालून चौकातून फिरणे कठीण झाले होतेच, आता आमचे घरही सुरक्षित राहिलेले नाही, या भावनेतून सांगलीकर आता धास्तावले आहेत. कारण, घराची बेल वाजवणारा, दारात उभा असणारा माणूस आता चोर, घरफोड्या, दरोडेखोर कुणीही असू शकतो, ही वस्तुस्थिती आहे. विश्रामबागेतील गुलमोहर कॉलनीत नीता शहा यांच्या घरी झालेला प्रकार गंभीर आहे. कायदा-सुव्यवस्था, नागरी सुरक्षा या सगळ्या विषयांच्या चिंधड्या उडाल्या आहेत. यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, जाळपोळ, घरफोडी, चोरी, घरात घुसून चेन स्नॅचिंग... अजून काय बाकी आहे.

वर्षाच्या पहिल्याच दिवशी कॉलेज कॉर्नर येथे भोसकून खून झाला. अगदी शुल्लक कारणातून भर चौकात भरदिवसा खून झाला. वडर कॉलनीत मावा देण्यावरून भोसकण्यात आले. गव्हर्मेंट कॉलनी चालत निघालेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी सायंकाळी चोरट्याने हिसकावली. शंभर फुटीवरील एका हॉटेलमध्ये हत्यार घेऊन आलेल्या एकाने मित्राचाच खून केला. 
त्यामुळे शांत असणारा विश्रामबाग परिसर भयभीत झाला आहे. कहर म्हणजे मोबाईल शोधण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर नशेखोरांना हल्ला केला. त्यात खून झाला... इतक्या मोठ्या घटना घडल्या असताना दोन दिवसांपूर्वी गुलमोहर कॉलनीतील घटनेने परिसर हदरला आहे. शहा या गुलमोहर कॉलनीतील मनीषा अपार्टमेंटमधील फ्लॅट क्र. १ मध्ये राहतात. शुक्रवारी सायंकाळी फ्लॅटची बेल वाजली. दरवाजा उघडला. त्यावेळी चोरट्याने क्षणात त्यांच्या गळातील १२. ४९० ग्रॅमची सोनसाखळी हिसकावली. भरदिवसा भरवस्तीत अशा घटना घडत असल्याने लोक भयभीत झालेत. पोलिसांच्या गस्तीवर आता प्रश्‍न चिन्ह निर्माण होत आहे. विश्रामबाग पोलिसांनी यावर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

नागरिकांनी हे करावे
अनोळखी व्यक्तीला घरात घेऊ नये

घराचे दरवाजे उघडे ठेवू नयेत

दरवाजाला लोखंडी शटर गरजेचे

परगावी जाताना पोलिसांसह शेजाऱ्यांना माहिती द्या

पोलिस मदतीसाठी तातडीने डायल ११२ वर संपर्क करा

घर, सदनिकेच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा लावा
गुन्हे प्रकटीकरण नावालाच

विश्रामबाग पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखा नावालाच आहे. केवळ बुटासुटात येणाऱ्यांनी गुन्हेगारांवर वचक ठेवणे गरजेचे आहे. गुन्हा घडू नये, यासाठी उपाययोजना म्हणून प्रभावी गस्त अपेक्षित आहे.

पायी गस्त पुन्हा हवी
विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी पायी गस्तचा उपक्रम हाती घेतला होता. प्रत्येक भागात स्वतः जात होते. निवडणुका आणि अन्य बंदोबस्तामुळे ती बंद पडली. ती पुन्हा सुरू करण्याची गरज आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.