देशात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली आतापर्यंत 3 हजार कोटी रुपये भारतीय नागरिकांच्या खिशातून काढण्यात आले असून यात प्रामुख्याने वृद्ध व्यक्ती, निवृत्त कर्मचारी यांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे.
मात्र डिजिटल अरेस्ट सारखा कुठला प्रकारच अस्तित्वात नसून कायद्यामध्ये कुणालाही डिजिटल अरेस्ट करता येत नाही, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनतेला सावध केले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार अबू आझमी यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नावर बोलताना फडणवीस यांनी डिजिटल अरेस्ट हा खोटेपणा असल्याचे म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, डिजिटल अरेस्ट असा कुठला प्रकारच नाही. कायद्यामध्ये कुणालाही डिजिटल अरेस्ट करता येत नाही. त्यामुळे आपल्याला कुणी डिजिटल अरेस्टचा फोन केला किंवा व्हिडीओ कॉल केला तर पहिल्याच क्षणी समजून जा की हा फ्रॉड आहे. यावर कधीही विश्वास ठेवू नका. 100 टक्के हा फ्रॉड असून कुणीही, कुठल्याही कायद्यान्वये कुणालाही डिजिटल अरेस्ट करू शकत नाही.
तुम्हाला एक फोन येतो, व्हिडीओ कॉल येतो. या व्हिडीओ कॉलवर समोर बसलेला स्वतःला कधी सीबीआयचा अधिकारी, कधी पोलीस अधिकारी, कधी कस्टम अधिकारी सांगतो आणि मग तो म्हणतो की, तुम्ही पार्सल मागवले होते का? तुमच्या नावाने पार्सल आले असून त्यात ड्रग्ज सापडले आहे. म्हणून तुम्हाला आम्ही डिजिटल अरेस्ट करत आहोत. तुम्ही हलायचे नाही आणि या स्क्रीनपुढे बसून राहायचे. मग मांडवली करून तुम्हाला 20 लाख रुपये, 40 लाख रुपये भरायला सांगितले जाते. सामान्य माणूस बिचारा घाबरून ते पैसे त्यांना ऑनलाईन ट्रान्सफर करत जातो, असे मुख्यमंत्री म्हणाले.आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात मोठे मोठे लोक अडकले आहेत. एका निवृत्त आयएएस अधिकाऱ्याने, निवृत्त नोदल अधिकाऱ्याने घाबरून पैसे दिल्याचे समोर आले आहे. हे पैसे खात्यात आल्याबरोबर वेगवेगळ्या खात्यातून पटापट जातात आणि असे करत ते कुठेतरी विदेशातल्या खात्यात जातात. अनेक गुन्ह्यात असे लक्षात आले आहे की, पूर्ण ऑपरेशन विदेशातून होते. मुख्य माणूस विदेशात असतो. साधारण अशा देशात असतो ज्याच्याशी आपला करार नाही. इथले लोक त्यांचे हँडलर असतात, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.
कुणालाही
डिजिटल अरेस्ट संदर्भात कॉल आला तर समोरचा माणूस फ्रॉड आहे समजा आणि थेट
1930 या नंबरवर कॉल करा. सायबर क्राईमकडे गोल्डन अवरमध्ये तक्रार केल्यास
आपण वेगवेगळ्या खात्तात ट्रान्सफर होणारे पैसे तात्काळ थांबवू शकतो. याबाबत
टीव्हीवरही जाहिराती चालू असली तरी रोज कुणी ना कुणी यात फसत नाही.
त्यामुळे डिजिटल अरेस्ट हा प्रकार खोटेपणा असून त्यावर विश्वास ठेऊ नका,
असे आवाहन फडणवीस यांनी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.