चेन्नईत फिरताना एका चुकीने केला घात! आयटी कंपनीत इंटर्नशिप करणाऱ्या महाराष्ट्रातील 7 जणांचा करुण अंत, जय पाटीलचा मृतदेह सापडला
जळगाव/पाळधी : चेन्नईच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील भावी अभियंत्यांवर काळाने घाला घातला. शनिवारी (२१ फेब्रुवारी) आलेल्या मोठ्या लाटेत वाहून गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी, पाळधी (ता.जामनेर) येथील जय नरेंद्र पाटील या विद्यार्थ्याचा मृतदेह अखेर दोन दिवसांच्या अथक शोधमोहिमेनंतर सोमवारी (ता. २३) सकाळी सापडला. जिल्हा प्रशासनाने या वृत्ताला दुजोरा दिला असून, जयचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील १५ तरुण मुले चेन्नई येथील 'कॉग्निजेंट' या नामांकित आयटी कंपनीत इंटर्नशिपसाठी गेली होती. शनिवारी सुटी असल्याने ही सर्व मुले पाँडिचेरी रोडवरील 'गोल्डन बीच'वर फिरण्यासाठी गेली होती. समुद्रकिनाऱ्यावर सेल्फी घेत असताना अचानक १० ते १५ फूट उंचीची लाट आली आणि पाहता-पाहता १५ मुले समुद्रात वाहून गेली. या दुर्घटनेत आतापर्यंत सात मृतदेह हाती लागले असून, त्यात चार मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. मृतांमध्ये भंडारा येथील मयूरी चौधरीसह नागपूर, नांदेड, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
दोन दिवस सुरू होती शोधमोहीम
जय पाटील शनिवारी लाटेसोबत वाहून गेल्यानंतर तो बेपत्ता होता. त्याचा शोध घेण्यासाठी कोस्टल गार्ड (तटरक्षक दल), हेलिकॉप्टर टीम, फायर रेस्क्यू टीम, स्थानिक महसूल पथके यांनी सलग ४८ तास शोधमोहीम राबविली. अखेर सोमवारी सकाळी जयचा मृतदेह सापडला. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरविळसिंग रावळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, शववाहिका जामनेरच्या दिशेने रवाना झाली असून, साधारण २४ तासांत मृतदेह मूळगावी पोहोचेल.
पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर
जय
हा नरेंद्र पाटील यांचा एकुलता मुलगा होता. त्याचे वडील पाळधी येथे शेती
करतात, तर आई श्रीमती क. द. नाईक माध्यमिक विद्यालयात शिक्षिका आहेत. जयची
बहीण सध्या मुंबईत शिक्षण घेत आहे. आपल्या एकुलत्या तरुण मुलाचा असा
दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण पाळधी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शासनाची भूमिका
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात होते. अडकलेल्या इतर मुलांच्या मदतीसाठी आणि मृतदेह महाराष्ट्रात आणण्यासाठी शासकीय पातळीवर वेगाने हालचाली करण्यात आल्या. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद च्चंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनीदेखील तमिळनाडूचे मुख्यमंत्री यांनादेखील 'एक्स'द्वारे विनंती केली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.