Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यात कात्रज घाटात भीषण अपघात! सळ्यांनी भरलेल्या ट्रकची बसला धडक; चालकाचा मृत्यू, क्लीनर केबिनमध्येच अडकला

पुण्यात कात्रज घाटात भीषण अपघात! सळ्यांनी भरलेल्या ट्रकची बसला धडक; चालकाचा मृत्यू, क्लीनर केबिनमध्येच अडकला
 

पुण्यातील कात्रज घाटात आज पहाटेच्या सुमारास एक थरारक अपघात घडला. लोखंडी पाईप आणि सळ्या वाहून नेणाऱ्या ट्रकने एका बसला मागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत ट्रकचा पुढचा भाग पूर्णपणे चिरडला गेला असून, ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. तर क्लीनर लोखंडी सळ्यांच्या ढिगाऱ्यात आणि केबिनमध्ये अडकल्याने त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आज पहाटे चार वाजताच्या सुमारास कात्रज नवीन बोगद्याकडून नवले ब्रिजच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर, जांभुळवाडी दरी पुलाजवळ हा अपघात झाला. सळ्यांनी भरलेला ट्रक वेगात असताना समोर असलेल्या बसला त्याने मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ट्रकच्या केबिनचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या ट्रक चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बसमधील ४ ते ५ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रकचा क्लीनर लोखंडी सळ्या आणि केबिनच्या पत्र्यांमध्ये अडकून पडला आहे. त्याला बाहेर काढणे अत्यंत कठीण झाले असून, अग्निशमन दलाचे जवान कटरच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

महामार्गावर वाहतुकीची कोंडी
घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस, अग्निशमन दल आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामुळे पहाटेच्या वेळीही महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. नवले ब्रिज आणि कात्रज परिसरातील उतारावर होणारे अपघात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले असून, प्रशासनाकडून सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.