दरवर्षी वेळेवर प्रीमियम भरूनही ऐन गरजेच्या वेळी विमा कंपनीने हात वर केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईच्या आरोग्यासाठी दरवर्षी ५० हजार रुपये मोजणाऱ्या एका मुलाला, आई आजारी पडल्यानंतर विमा कंपनीच्या कार्यालयातून रिकाम्या हाताने परतावे लागले. या घटनेनंतर सोशल मीडियावर आरोग्य विमा कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नेमकी घटना काय?
संबंधित तरुणाने सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली आहे. त्याने आरोप केला की, "विमा कार्यालयात तासनतास वाट पाहायला लावून अखेर माझा क्लेम नाकारण्यात आला. सर्वात संतापजनक बाब म्हणजे, तेथील एका एजंटने त्याला, आम्हाला विचारून पॉलिसी घेतली होती? असा प्रश्न विचारला. यामुळे विमा कंपन्या ग्राहकांप्रती किती असंवेदनशील आहेत, हे समोर आले आहे.
प्रीमियमसाठी वसुली, क्लेमसाठी नकार
या पोस्टनंतर सोशल मीडियावर ग्राहकांनी विमा कंपन्यांविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. नेटकऱ्यांनी आरोप केला की, कंपन्यांचे लक्ष फक्त प्रीमियम गोळा करण्यावर असते, पण क्लेम देण्याची वेळ येते तेव्हा तांत्रिक कारणे पुढे केली जातात. एका युजरने म्हटले, "मी ८ वर्षांपासून ८० हजार रुपये प्रीमियम भरतोय, पण मला आता भीती वाटतेय की माझ्या बाबतीतही असंच घडेल का?"वाढत्या तक्रारी पाहता या क्षेत्रात कडक नियमावली आणि सरकारी हस्तक्षेपाची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
कंपनीचे स्पष्टीकरण
या वादानंतर हेल्थ इन्शुरन्सने सार्वजनिकरीत्या आपली बाजू मांडली आहे. क्लेमचे निर्णय हे पॉलिसी कागदपत्रे आणि वैद्यकीय नोंदींच्या आधारे घेतले जातात. जर पॉलिसी घेताना जुन्या आजारांची माहिती दडवली असेल, तर नियमांनुसार क्लेम नाकारला जाऊ शकतो, असं कंपनीने सांगितले. तक्रार निवारणासाठी आमच्याकडे स्वतंत्र प्रक्रिया असल्याचेही कंपनीने नमूद केले. मात्र, एजंटच्या उद्धट वागणुकीवर कंपनीने कोणतेही भाष्य केलेले नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.