Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'मोदी आम्हाला फसवत होते', सुप्रीम कोर्टाने टॅरिफबाबत दणका दिल्यानंतर ट्रम्प यांचे अजब विधान

'मोदी आम्हाला फसवत होते', सुप्रीम कोर्टाने टॅरिफबाबत दणका दिल्यानंतर ट्रम्प यांचे अजब विधान
 
 
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने मोठा झटका दिला. वर्षभरापासून ट्रम्प यांच्या टॅरिफ या शब्दामुळे अनेक देश धास्तावले होते. अखेर ट्रम्प यांनी लादलेले टॅरिफ बेकायदा असल्याचा निर्वाळा तिथल्या सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर ट्रम्प यांनी आता जगातील सर्व देशांवर १० टक्के टॅरिफ असेल असा निर्णय घेतला आहे. मात्र भारतावर १८ टक्के की १० टक्के टॅरिफ असेल, याची निश्चिती होऊ शकलेली नाही.  दरम्यान शुक्रवारी अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली. तसेच या निकालाचा भारत-अमेरिका व्यापार करारावर काय परिणाम होईल, असे विचारले असता ट्रम्प म्हणाले, माझ्या विनंतीमुळे भारताने रशियाकडून होणारी तेलाची आयात कमी केली. सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे या करारात काहीही बदल होणार नाही. विशेष म्हणजे, ट्रम्प काहीही दावा करत असले तरी भारताने अद्याप रशियन तेलाच्या आयातीवर अधिकृत भूमिका मांडलेली नाही. भारताच्या ऊर्जा स्त्रोताचा विचार करता राष्ट्रीय हिताचा निर्णय घेतला जाईल, असे भारत सरकारने स्पष्ट केलेले आहे.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
सुप्रीम कोर्टाने टॅरिफ बेकायदेशीर असल्याचे सांगितल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय निराशाजनक असल्याचे म्हटले. यानंतर या निर्णयाचा भारत-अमेरिका व्यापार करारावर काय परिणाम होणार, असा प्रश्न विचारला असता ट्रम्प म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयाचा व्यापार करारावर कोणताही परिणाम होणार नाही.
'ते आम्हाला फसवत होते'

"भारत-अमेरिका व्यापार करारात काहीही बदल होणार नाही. ते (भारत) टॅरिफ भरतील आणि आम्ही कोणतेही शुल्क भरणार नाही. पंतप्रधान मोदी एक महान व्यक्ती आहेत. ते ज्यांच्या विरोधात होते, त्यांच्यापेक्षा मोदी फार हुशार आहेत. अमेरिकेच्या बाबत बोलायचे झाल्यास ते आम्हाला फसवत होते. पण आम्ही भारताबरोबर एक करार केला आणि आता एक योग्य करार झाला आहे. आम्ही त्यांना शुल्क देणार नाही आणि ते आपल्याला शुल्क देणार आहेत", असेही डोनाल्ड ट्रम्प पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले.

माझे भारताशी चांगले संबंध
भारताशी असलेल्या संधाबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले, "भारताबरोबर माझे उत्तम संबंध आहेत. आम्ही त्यांच्याशी व्यापार करत आहोत. आमच्या विनंतीवरून भारताने रशियाकडून तेल घेणे कमी केले. युक्रेन-रशिया युद्धात दरमहा २५ हजार लोकांचा जीव जात आहे. आम्हाला यातून मार्ग काढायचा होता."

"माझे पंतप्रधान मोदींशीही उत्तम संबंध आहेत. मी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धदेखील थांबवले. काल पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सांगितले की, मी युद्ध थांबवून ३.५ कोटी लोकांचे जीव वाचवले. हे टॅरिफमुळेच शक्य झाले होते. कारण मी त्यांना २०० टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली होती," असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.