Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

न्यायालयात अदानी-अंबानींचे नाव घेताच सरन्यायाधीश भडकले; म्हणाले, "मी तुम्हाला इशारा देतोय, सावध राहा."

न्यायालयात अदानी-अंबानींचे नाव घेताच सरन्यायाधीश भडकले; म्हणाले, "मी तुम्हाला इशारा देतोय, सावध राहा."

नागपूर : न्या. भूषण गवई मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये निवृत्त झाल्यावर न्या.सूर्यकांत यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली. सामान्यत: शांत, संयमी स्वभावाचे असणाऱ्या न्या.सूर्यकांत यांनी शासन-प्रशासनाची कठोर मात्र संयमित राहून कानउघाडणी केली.

मात्र अनेकदा न्या.सूर्यकांत यांनी त्यांचे रौद्र रुपही दाखविले.

काही दिवसांपूर्वी एका सुनावणीदरम्यान, राजस्थानच्या एका आमदाराने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर विधानसभेतून टीका केली होती. त्यावर उत्तर देताना सरन्यायाधीशांनी न्यायालयाच्या नादी लागू नका, आम्हाला कारवाई कशी करायची आहे, हे ठाऊक आहे, अशा शब्दात सुनावले होते. आता सरन्यायाधीश यांनी पुन्हा एकदा संतापलेले रुप दाखविले.

अलिकडेच सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान एका वकीलाने अदानी आणि अंबानी यांचे नाव घेतले. न्यायालय त्यांच्यासाठी कार्य करत असल्याचे विधान त्या वकीलाने केले. यानंतर सरन्यायाधीश त्या वकीलावर चांगलचे भडकले.

नेमके काय घडले?

सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी वकील मॅथ्यूज नेडुम्पारा यांना त्यांच्या आक्षेपार्ह मांडणीबद्दल चांगलेच सुनावले. "अशा प्रकारचे गैरवर्तन सुरूच राहिले, तर कठोर कारवाई केली जाईल," असा स्पष्ट इशारा सरन्यायाधीशांनी दिला.

'मेंशनिंग'च्या टप्प्यात नेडुम्पारा यांनी कॉलेजियम प्रणालीला आव्हान देणारी आणि राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग (एनजेएसी) पुनर्स्थापित करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केल्याचे सांगितले. मात्र सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट केले की, अशी कोणतीही याचिका नोंदणी विभागाकडे (रजिस्ट्री) उपलब्ध नाही.

यानंतर नेडुम्पारा यांनी केलेल्या पुढील वक्तव्यामुळे सरन्यायाधीश नाराज झाले. "अदानी आणि अंबानी यांच्यासंदर्भातील प्रकरणांसाठी घटनापीठे स्थापन केली जातात; मात्र सामान्य माणसांशी संबंधित प्रश्न ऐकून घेतले जात नाहीत," असे त्यांनी म्हटले. या विधानावर सरन्यायाधीश चांगलेच संतप्त झाले.

तीव्र नाराज झालेल्या सरन्यायाधीशांनी त्यांना कठोर शब्दांत सुनावले, "मिस्टर नेडुम्पारा, माझ्या न्यायालयात काय मांडता याची नीट जाणीव ठेवा. तुम्ही मला चंदीगडमध्ये पाहिले आहे, दिल्लीतही पाहिले आहे. मी तुम्हाला इशारा देतोय,सावध राहा. इतर खंडपीठांसमोर जसे वागलात तसे येथे वागता येईल, असा गैरसमज करून घेऊ नका. मी स्पष्ट इशारा देतोय."

उल्लेखनीय बाब म्हणजे, २०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने नेडुम्पारा यांची याचिका नोंदणीस नकार दिला होता. एनजेएसी संदर्भातील मुद्द्यावर आधीच निर्णय दिला गेला असल्याने, त्याच विषयावर नवी रिट याचिका दाखल करता येणार नाही, असे रजिस्ट्रीने नमूद केले होते. यापूर्वीही, गेल्या वर्षी तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी याचिकेच्या सूचीकरणाची मागणी करताना नेडुम्पारा यांना फटकारले होते. "न्यायालयात राजकीय भाषण करू नका," असे स्पष्ट शब्दांत सरन्यायाधीश खन्ना यांनी त्यांना सुनावले होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.